जिल्हा परिषदपेक्षा पंचायत समिती मतदारसंघातच खरी चुरस

जिल्हा परिषदपेक्षा पंचायत समिती मतदारसंघातच खरी चुरस
Published on
Updated on

पाटण : गणेशचंद्र पिसाळ पाटण तालुक्यात जिल्हा परिषद मतदारसंघात नव्याने पुनर्रचना झालेल्या नाटोशी जि. प. मतदारसंघातील पंचायत समिती नाटोशी व येराड या दोन्ही मतदारसंघात कमालीची राजकीय चुरस पहायला मिळणार आहे. तांत्रिक व नैसर्गिकदृष्ट्या शिवसेना तथा राज्याचे गृह राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या देसाई गटाचा बालेकिल्ला असलेली अनेक गावे या मतदारसंघात समाविष्ट असली तरी गावांच्या पुनर्रचनेत कोयना व मोरणा विभागातील काही गावांमुळे ऐनवेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर गटाला किमान एका पं. स. मतदारसंघात लॉटरी लागण्याच्या चर्चा आहेत. ऐनवेळी आरक्षण व सक्षम उमेदवारांवरही या मतदारसंघांसह पंचायत समिती सत्तेचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

मोरणासह कोयना विभागातील अनेक गावांचा समावेश होऊन यात नाटोशी हा नवा जिल्हा परिषद मतदारसंघ उदयास आला आहे. यात नाटोशी व येराड असे दोन पं. स. मतदारसंघ नव्याने अस्तित्वात आले आहेत. प्रामुख्याने या मतदारसंघांवर ना. देसाई व पाटणकर गटाची खरी राजकीय भिस्त राहणार आहे . पंचायत समितीच्या सत्तेची समीकरणे जुळताना यापैकी किमान एका पं. स. मतदार संघातील जय-पराजय हा ऐनवेळी निर्णायक ठरण्याच्या सर्वाधिक शक्यता आहेत.

तालुक्यातील देसाई पाटणकर राजकीय गटांच्या राजकीय, भौगोलिक व नैसर्गिक परिस्थितीचा अभ्यास लक्षात घेता मोरणा विभागाने ना. देसाई व कोयना विभागाने पाटणकर गटाची कायमच साथ दिली हा इतिहास आणि वर्तमानही आहे. मात्र नव्याने झालेल्या नाटोशी या जि. प. मतदारसंघात आता कोयना व मोरणा विभागातील गावांची भेळमिसळ झाल्याने निश्चितच येथे राजकीयदृष्ट्या कोण वरचढ ठरणार व हा नक्की कोणाचा बालेकिल्ला हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. या विभागात ना. देसाई व पाटणकर दोन्ही गटांकडे तुल्यबळ पदाधिकारी, कार्यकर्ते आहेतच याशिवाय संभाव्य आरक्षणावर डोळा ठेवून अनेक इच्छुकांच्याही पडद्यामागून हालचाली सुरू आहेत. यापूर्वी सन 2007 च्या निवडणुकीत याच ना. देसाईंच्या बालेकिल्ल्यात घुसून पाटणकर गटाने रंगराव जाधव यांच्या माध्यमातून येथे विजय मिळवला होता. त्यावेळी याच निर्णायक मतांवर सत्यजितसिंह पाटणकर हे पहिल्या टप्प्यातच सभापतीही झाले होते. निश्चितच हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या तितकाच निर्णायक असल्याने त्यादृष्टीने ही या ठिकाणी दोन्ही गटांकडून सार्वत्रिक ताकद लावली जाणार आहे.

तालुक्याच्या राजकारणात दोन्ही राजकीय गटांसाठी जिल्हा परिषदेपेक्षा पंचायत समितीची सत्ता महत्त्वाची असल्याने त्यादृष्टीने राजकीय आखणी केली जाते. गतवेळी 14 पं. स. मतदारसंघ अस्तित्वात होते. त्यावेळी तब्बल आठ पंचायत समिती मतदारसंघांवर सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने एकतर्फी निर्विवाद घवघवीत यश मिळवून पाच वर्षे सभापती, उप सभापतींसह सर्व पदे आपल्याचकडे ठेवण्यात यश मिळवले . आमदारकीची सत्ता असतानाही ना. देसाईंना त्यावेळी केवळ सहाच सदस्य निवडून आणता आले. आता नव्याने 16 पं. स. सदस्य निवडून जाणार असल्याने यात सर्वाधिक सदस्य आपल्याच गटाचे करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी चांगलाच चंग बांधला आहे. यात कोण वरचढ ठरणार यावरही अनेक राजकीय गणिते अवलंबून राहणार आहेत. गेल्या काही वर्षांत तालुक्यातील अनेक विभागांत राजकीय उलथापालथ झाल्याने आपापले बालेकिल्ले शाबूत राखण्यासाठी करण्यासाठी ना. देसाई, पाटणकर गटात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. यातूनच नाटोशीसारख्या पुनर्रचना झालेल्या मतदारसंघात सर्वाधिक ताकद लावून येथे दोन्ही जागा जिंकण्यासाठी ना. देसाई व पाटणकर गटाकडून कमालीचे प्रयत्न होणार यात शंकाच नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news