

कराडः पुढारी वृत्तसेवा टंचाईग्रस्त गावांसाठी जलजीवन मिशन वरदान ठरले असून कराड तालुक्यातील 189 गावात जलजीवन मिशन मधून पाणी योजनांची कोट्यवधींची कामे मार्गी लागली आहेत. तब्बल 90 कोटींची कामे प्रस्तावित असून यातील 48 कामे पूर्ण तर 57 कामे प्रगतीपथावर आहेत. कराड पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत ही कामे सुरू आहेत. कराड तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत 48 कामे पूर्ण झाली आहेत. 57 कामे प्रगतीपथावर आहेत. 6 कामांचे कार्यादेश प्राप्त झाले आहेत तर 51 गावांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
13 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे तर 14 कामांना तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. बेलदरे, भरेवाडी, करंजोशी, लटकेवाडी, लोहारवाडी, पाचुपतेवाडी, नारायणवाडी, पिंपरी, डेळेवाडी, गोटेवाडी, आरेवाडी, अबईचीवाडी, धावरवाडी, बाबरमाची- डिचोली, येणपे- चोरमारवाडी, उंब्रज – गोटेवाडी, गायकवाडवाडी, गमेवाडी, गोळेश्वर, कार्वे- गोपाळनगर, हरपळवाडी, इंदोली, कालगाव, कापील, कार्वे, खराडे, खोडशी, कोडोली, कोपर्डेहवेली, माळवाडी, येणपे-माटेकरवाडी, मुनावळे, मुंढे, नांदगाव, नवीन नांदगाव, पेरले, राजमाची, साबळवाडी, चोरे- साखरवाडी, सवादे, सावरघर, शेणोली स्टेशन, वनवासमाची स.गड, वसंतगड, विजयनगर, विंग, विरवडे, शिरगाव- वाजेवाडी येथील कामे पूर्ण झाली आहेत. जलजीवन मिशनच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे वाडीवस्तीवरील लोकांना पाण्याची उपलब्धता झाली आहे. 'घर तिथे नळ' कनेक्शन देण्यात आली आहेत. 189 गावांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
पाणी योजनांची 90 कोटींची कामे सुरु
गाव, वाडीवस्तीवरील लोकांच्या पाण्याची सोय
उन्हाळ्यात वानरवाडी, बामणवाडी येथे टँकरणे पाणीपुरवठा करावा लागत होता. या गावात जलजीवन मिशन अंतर्गत कामे सुरू असल्याने ही दोन्ही गावे टँकरमुक्त होणार आहेत,अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठ्याचे उपअभियंता सुनील बसुगडे यांनी दिली. योजनेसाठी दहा टक्के लोकवगर्णी घेण्यात येत असली तरी हे पैसे ग्रामपंचायतीच्या खात्यावरच ठेवून योजनेच्या देखभाल दुरूस्तीसाठी वापरली जात आहे.