खटाव : पुढारी वृत्तसेवा : स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास बनलेल्या खटाव आणि माण तालुक्यात परदेशी पाहुण्यांची गणना सुरू असून येरळा माणगंगेच्या परिसरातील पाणथळ जागा स्थलांतरित पक्ष्यांची आश्रयस्थाने बनली आहेत.
खटाव आणि माण हे सातारा जिल्ह्यातील पूर्वेकडील दुष्काळी तालुके. पण, गेल्या काही वर्षांपासून या भागात जलसंधारणाची कामे झाली आहेत, सध्याही अनेक कामे सुरू आहेत. काही पाणी योजनांचे पाणी आले आहे, त्यामुळे इथल्या जैवविविधतेत आणखी भर पडली आहे. असा हा प्रदेश आता अनेक स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान बनला आहे, अशी माहिती पक्षी अभ्यासक, डॉ. प्रवीणकुमार चव्हाण यांनी दिली.
विस्तीर्ण गवताळ माळराने पाणथळी, शेतीप्रदेश या विविध अधिवासात पक्ष्यांच्या अनेक प्रजातींचा अधिवास आढळून येत आहे. गेल्या काही वर्षांपासून येरळा- माणगंगेच्या भूभागातून या भागात पक्षी सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यामुळे साहजिकच इथल्या अधिवासांचे संरक्षण व संवर्धन होत आहे.
गवताळ शेतीप्रदेश तसेच पाणथळी अधिवासातील पक्ष्यांची शास्त्रीय पद्धतीने गणना, नोंदी तसेच त्यांच्या अधिवासाच्या संवर्धनासाठी पक्षीगणना करण्याचा विचार करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात पक्षी अभ्यासक, पक्षीमित्र, स्थानिक ग्रामस्थ, वनविभाग, विद्यार्थी तसेच महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना व बर्ड काऊंट इंडियामार्फत मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे. केलेले सर्वेक्षण 'ई- बर्ड' या पक्षीविषयक संकेतस्थळावर अपलोड करण्यात येत आहे. अनेक उत्साही पक्षी निरीक्षक व पक्षी अभ्यासू व्यक्तींना ही गणना करण्यात येत आहे. नंतर राष्ट्रीय पातळीवर खटाव- माणचे पक्षी वैभव या प्रकल्पावर संशोधन पत्र तयार करण्यात येणार आहे. हे संशोधन पत्र भविष्यात माणदेशाच्या पक्ष्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
वेटलॅन्डस इंटरनॅशनल साउथ एशिया आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीद्वारे समन्वयित आशियाई वॉटरबर्ड सेन्सस हा भारतातील सर्वात दीर्घकाळ चालणारा नागरी विज्ञान उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत, सातारा जिल्ह्यातील खटाव – माण परिसरातील स्थळांसह पाणथळ प्रदेशांचा कल आणि परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी पाणपक्ष्यांची पद्धतशीर गणना आणि निरीक्षण केले जाते.
गेल्या अनेक वर्षांपासून येथे जलसंधारणाची कामे करण्यात आली असून त्यामुळे या परिसराच्या जैवविविधतेत भर पडली आहे. पाणथळ प्रदेश आणि विस्तीर्ण गवताळ प्रदेश अशा विविध अधिवासांमध्ये पक्ष्यांच्या अनेक प्रजाती आढळतात. हिवाळ्यात आशियाई पाणपक्षी गणनेसंदर्भात येरळा माणगंगा नदीकाठी पक्षी सर्वेक्षण केले गेले. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात देशी स्थलांतरित पक्ष्यांच्या १३४ प्रजातींपैकी एकूण ६,०२५ पक्ष्यांची नोंद करण्यात आली होती.
येरळवाडी, सूर्याचीवाडी, पेडगाव, येळीव, दरजाई, कानकात्रे, मायणी, पिंगळी, किरकसाल, गोंदवले, लोधवडे, देवापूर, राजेवाडी या ठिकाणांसह आठ हॉटस्पॉटस्चा शोध घेत पक्ष्यांची नोंद करण्यात येत आहे. ही ठिकाणे स्थलांतरित पक्ष्यांसाठी कॉरिडॉर आहे. ग्रेटर फ्लेमिंगो, नॉर्दर्न शोव्हेलर, नॉर्दर्न पिनटेल, ग्रेटर स्पॉटेड ईगल, बार हेडेड गीज, रुडी शेलडक, ग्रीन टील, रेड क्रेस्टेड पोचार्ड, युरेशियन विजॉन, ब्राह्मणी पतंग, मार्श हॅरियर, मंगोलियन शॉर्ट टोड लार्क, शॉर्ट टॉड स्नेक ईगल, सँडपायपर, प्लोवर्स, सिगल्स अशा विविध स्थानिक स्थलांतरित पक्ष्यांचा या भागात वावर आहे. गेल्या वर्षी ई – बर्डवर सुमारे २२० पक्ष्यांची नोंद झाली.
या सर्वेक्षणात जलचर अधिवासातील पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने गणना व नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या अधिवासाच्या संवर्धनासाठी या पक्षीगणनेचा विचार करण्यात येत आहे. या पाहणीत पक्षी अभ्यासक डॉ. प्रवीण चव्हाण, चिन्मय सावंत, पक्षीमित्र अपूर्व चव्हाण, विशाल काटकर यांचा सहभाग आहे.
महाराष्ट्र पक्षी मित्र संस्था आणि बर्ड काउंट इंडिया, वेटलॅन्ड इंटरनॅशनल यांचे तांत्रिक मार्गदर्शन आणि मदत मिळत आहे. हा पक्षीनिरीक्षण डेटा घेऊन राष्ट्रीय स्तरावर खटाव-माणचे पक्षीवैभव या प्रकल्पावर एक शोधनिबंध तयार केला जात आहे. हा शोधनिबंध भविष्यातील पाणथळ जागा आणि पाणपक्षी संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावेल.