खटाव तालुक्यात फ्लेमिंगोंची अद्याप प्रतीक्षाच; पट्टेरी राजहंस ठरताहेत आकर्षण

खटाव तालुक्यात फ्लेमिंगोंची अद्याप प्रतीक्षाच; पट्टेरी राजहंस ठरताहेत आकर्षण

खटाव : अविनाश कदम ; पक्षी निरीक्षक, पक्षी अभ्यासकांसह सर्वसामान्यांचे आकर्षण ठरणारे, हजारो किलोमीटर अंतरारून स्थलांतरित होवून थंडीच्या कालावधीत दरवर्षी खटाव तालुक्यातील येरळवाडी मध्यम प्रकल्प, पेडगाव आणि माण तालुक्यातील पिंगळी तलावात येणारे. फ्लेमिंगो (रोहित) पक्षी यंदा मात्र जानेवारीचा उत्तरार्ध सुरू झाला तरी आले नाहीत. सर्वच पाणीसाठ्यांमध्ये पूर्ण क्षमतेचा पाणीसाठा असल्याने पुरेशी दलदल अद्याप उपलब्ध झाली नाही. वाढत्या शहरीकरणामुळेही परदेशी पाहणे येण्यावर मर्यादा पडत असल्याचे यावर्षी ठळकपणे दिसून येत आहे.

खटाव तालुक्यात दरवर्षी थंडीच्या कालावधीत हजारो किलोमीटरचे अंतर कापून फ्लेमिंगोसह अनेक परदेशी पाहुणे येतात. तालुक्यात जलसंधारणाची कामे होवून काही पाणी योजनांचे पाणी आले आहे. त्यामुळे इथल्या जैवविविधेत आणखी भर पडली आहे. पूर्वापार दुर्लक्षीत असा हा प्रदेश अनेक स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान बनला आहे. विस्तीर्ण गवताळ माळराने पाणथळी, शेतीप्रदेश, दलदल अशा विविध अधिवासात पक्ष्यांच्या अनेक प्रजातींचा अधिवास आढळून येत आहे. खटाव आणि माण तालुक्यातील येरळवाडी, सूर्याचीवाडी, पेडगाव, येळीव, दरजाई, कानकात्रे, मायणी, पिंगळी, किरकसाल, गोंदवले, लोधवडे, देवापूर, राजेवाडी या ठिकाणांसह आणखी आठ हॉटस्पॉटवर परदेशी पाहणे विहार करताना पाहण्याची संधी पक्षीप्रेमींना नेहमी मिळते.

दुष्काळी तालुक्यांमधील ही ठिकाणे स्थलांतरित पक्ष्यांसाठी कॉरिडॉर आहे. ग्रेटर फ्लेमिंगो, नॉर्दर्न शोव्हेलर, नॉर्दर्न पिनटेल, ग्रेटर स्पॉटेड ईगल, बार हेडेड गीज, रुडी शेलडक, ग्रीन टील, रेड क्रेस्टेड पोचार्ड, युरेशियन विजॉन, ब्राह्मणी पतंग, मार्श हॅरियर, मंगोलियन शॉर्ट टोड लार्क, शॉर्ट टॉड स्नेक ईगल सँडपायपर, प्लोवर्स, सिगल्स अशा विविध स्थानिक स्थलांतरित पक्ष्यांचा या भागात वावर असतो. गेल्या वर्षी ई – बर्डवर खटाव आणि माण तालुक्यातील अधिवासांमध्ये सुमारे २२० पक्ष्यांची नोंद झाली होती. परदेशी पाहुण्यांपैकी ग्रेटर फ्लेमिंगो सर्वाधिक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात.

फ्लेमिंगो पहाण्यासारखी जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेरुन हजारो पक्षीप्रेमी खटाव तालुक्यात येण्याचा प्रघात आहे. गेल्या वर्षी तर २० नोव्हेंबरलाच येरळवाडीत फ्लेमिंगोंचे आगमन झाले होते. अगदी वडूजलाही त्यांचा विहार पहायला मिळाला होता. चालू वर्षी मात्र जानेवारीचा उत्तरार्ध संपत आला तरी परदेशी फ्लेमिंगो पक्ष्यांनी प्रतिक्षा करायला लावली आहे.

जानेवारीच्या सुरुवातीलाच पट्टेरी राजहंस खटाव तालुक्यात दाखल झाल्याने फ्लेमिंगोही येतील असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, पाणीसाठ्यांमधील पूर्ण क्षमतेइतका पाणीसाठा, कमी दलदल, वाढते शहरीकरण, प्रदूषण यामुळे परदेशी पाहुण्यांचे आगमन लांबले आहे. सुर्याचीवाडी येथील तलावात रेड क्रेस्टेड पोचार्ड या परदेशी पक्ष्यांचे आगमन झाल्याचे दिसत आहे. मात्र, पक्षीप्रेमींची फ्लेमिंगोंच्या आगमनाची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.

परदेशी पाहुण्यांची संख्या रोडावतेय…

खटाव तालुक्यात परदेशी पाहुणे मोठ्या संख्येने यायचे. २०१४ साली तब्बल ६० फ्लेमिंगोचा थवा येरळवाडीत दाखल झाला होता. सध्या पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासांवर होणारे अतिक्रमण, वाढते शहरीकरण, प्रदुषण व अन्य कारणांमुळे खटाव तालुक्यात स्थलांतर करून येणाऱ्या परदेशी पाहुण्यांची संख्या रोडावली आहे.

फ्लेमिंगो यायला उशीर झाला असला तरी पाणीसाठ्यांमधील पाणी कमी होवून दलदल वाढली कि ते नक्की येतील. फ्लेमिंगोंसाठी थंडी, ऊन आणि दलदल गरजेची असते. त्यांचे आयुर्मान जसे वाढत जाते तसा त्यांचा रंगही बदलताना आपल्याला खटाव तालुक्यात पहायला मिळतो. पूर्वी ५० ते ६० रोहित पक्ष्यांचा थवा आपल्याकडे यायचा. आता इतर अनेक कारणांमुळे या परदेशी पाहुण्यांना एकांत मिळणे कठीण होत आहे. त्यामुळेच त्यांची संख्या कमी होत आहे.
– डॉ. प्रवीणकुमार चव्हाण, पक्षी अभ्यासक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news