कराड दक्षिणेत भुरट्या चोरांचा सुळसुळाट

file photo
file photo

उंडाळे : पुढारी वृत्तसेवा : कराड दक्षिणच्या डोंगरी भागात भुरट्या चोर्‍या वाढल्या असून चोरट्यांनी दारात ठवलेल्या लोखंडी कॉट, पाण्याचे बॅरेल, पाईप, लोखंडी पत्रा यासह काढणी केलेले सोयाबीनसह धान्याच्या चोरीचा सपाटा लावला आहे. उंडाळे, शेवाळवाडी येथील स्मशानभूमीतील लोखंडी सापळा ( पिंजरा) अज्ञात चोरट्यानी चोरून नेला आहे.

कराड दक्षिणच्या डोंगरी भागात गेल्या एक दीड महिन्यापासून भुरट्या चोरट्यांचा सुळसुसाट वाढला असून या चोरट्यांनी खुडेवाडी, सावंतवाडी येथील साहित्य रात्री चोरून नेले. याशिवाय साळसिरंबे येथील दोन लोखंडी कॉट, पाण्याचे बॅरल व अन्य लोखंडी भंगार साहित्य चोरट्यांनी पळवून नेले.

गेल्या चार दिवसांपूर्वी साळशिरंबे येथील माळावरील घरात व दारात काढणी करून ठेवलेले सोयाबीन चोरण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी प्रारंभी घराच्या बाहेरून कड्या घालून दारात ठेवलेले सोयाबीन पळवण्याचा प्रयत्न केला. चोरट्याने दार उघडून कडी लावण्याचा प्रयत्न करतेवेळी दाराचा व कडीचा आवाज झाल्याने घरमालक जागे झाल्याने चोरट्याने धूम ठोकली.

याशिवाय उंडाळे, शेवाळवाडी येथील स्मशानभूमीतील मृतदेह जाळण्यासाठी वापरण्यात येणारा सापळा व त्या सापळ्याचे लोखंड अज्ञातानी चोरून नेले याबाबतची फिर्याद शेवाळेवाडीचे ग्रामसेवक विकास थोरात यांनी कराड तालुका पोलिसात दिली आहे. याशिवाय सावंतवाडी, साळशिरंबे खुडेवाडी, मनव, नांदगाव परिसरात चोरी झालेल्या स्थानिकांनी नांदगाव पोलिसाला तक्रार दिली.

गत आठवड्यात मनव येथील आनंदा मोहिते यांच्या दारातील कॉट चोरताना भंगार गोळा करणार्‍या टेम्पोतील तिघांना पकडून मनवकरांनी चांगला चोप दिला. पोलिसात त्यांना नेण्यात आले. पुढे त्यांच्यावर काय कारवाई झाली हे कळले नाही. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेणे गरजेचे आहे. दक्षिण विभागात भुरट्या चोर्‍या वाढल्या असून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

चोरट्यांना ग्रामस्थांकडून चोप

साळशिरंबे, मनू, नांदगाव, खुडेवाडी, सावंतवाडी परिसरात बिबट्याची मोठी दहशत असून या बिबट्याच्या दहशतीने लोक रात्री लवकर घराचे दरवाजे बंद करून झोपी जातात. याचा फायदा घेत चोरटे चोर्‍या करत आहेत. चोरटे भंगार गोळा करणारे असून ते टेम्पोच्या माध्यमातूनच विभागात चोर्‍या करत असल्याचे लोकांचे म्हणने आहे. काही दिवसांपूर्वी लोकांनी चोरट्यांना पकडून त्यांना चोप देवून पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news