उदयसिंह पाटील गट ‘अ‍ॅक्टिव्ह’ मोडमध्ये

उदयसिंह पाटील गट ‘अ‍ॅक्टिव्ह’ मोडमध्ये
उदयसिंह पाटील गट ‘अ‍ॅक्टिव्ह’ मोडमध्ये

उंडाळे : पुढारी वृत्तसेवा रयत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक यावर्षी पहिल्यांदाच होत आहे. तब्बल 26 वर्षानंतर स्व. विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या पश्‍चात ही निवडणूक होत आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक दोन सख्या चुलत भावात होत आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसर्‍या दिवशी सत्ताधारी अ‍ॅड. उदयसिंह पाटील गटाकडून 22 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. विरोधी गटाकडून अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. मात्र विरोधी अ‍ॅड. राजाभाऊ पाटील गटाकडून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू आहे.

रयत सहकारी साखर कारखान्यासाठी एकूण 21 संचालक निवडले जाणार असून 5 ऊस उत्पादक गटातून 15 संचालक, यातील 2 महिला प्रवर्ग, 3 इतर मागास प्रवर्ग व 1 संस्था प्रतिनिधी असेल. कारखान्यासाठी एकूण 9 हजार सभासद आहेत. यातील काही सभासद मयत आहेत. काहींना तांत्रिक बाबींमुळे सभासदत्व मिळालेले नाही. 7 हजार ते 7 हजार 500 सभासद उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. विरोधी अ‍ॅड. राजाभाऊ पाटील गटाकडून ही निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. मात्र अद्याप त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले नाहीत. सोसायटी निवडणूक व अन्य निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी रयत कारखान्याच्या कार्यक्षेत्रात स्वा.सै. शामराव पाटील पतसंस्था व रयत सहकारी साखर कारखाना या दोन संस्थेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी केली होती. यात त्यांना अपेक्षित यश आले नाही. शामराव पाटील पतसंस्थेसाठी त्यांना त्यांच्याच संस्थेतील कर्मचार्‍यांना व जवळच्या मित्रांना उमेदवारी देण्याची वेळ आली.

शामराव पाटील पतसंस्था ही मर्यादीत क्षेत्रात आहे. पण कारखान्याचे कार्यक्षेत्र कराड आणि पाटण तालुका आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यात कारखाना निवडणुकीसाठी उमेदवार मिळविताना त्यांची दमछाक झाली आहे. उमेदवार मिळावे यासाठी त्यांनी आपले पारंपारिक विरोधक असलेले डॉ. अतुल भोसले गटावर भिस्त ठेवली आहे. परंतु डॉ. भोसले गटाला कारखाना उभारणी करताना, सभासद देताना सोईस्कर बाजूला ठेवले होते. त्यामुळे उंडाळकर गट सोडून गेलेले नाराज कार्यकर्ते त्यांच्या गळाला लागतील अशी शक्यता आहे.
नांदगाव येथे झालेल्या प्रचार सभेत अ‍ॅड. राजाभाऊ पाटील यांनी प्रचार सभेत जे कार्यकर्ते जमवले त्या पैकी साठ टक्के कार्यकर्तेे डॉ. अतुल भोसले गटाचे होते. यामध्ये बहुतांश सभासद नव्हते. यावरून अ‍ॅड. राजाभाऊ पाटील यांचा गट तितकासा मजबूत नसल्याचे दिसून येत आहे.

या उलट उदयसिंह पाटील यांनी जुन्या संचालक मंडळातील पाच ते सहा जणांना उमेदवारी देत नव्या चेहर्‍यांना संधी दिली आहे. यामध्ये कराड पं.स.चे माजी सभापती प्रदीप पाटील, माजी सभापती सौ. विजया माने, जि.प.सदस्य प्रदीप पाटील, विद्यमान उपाध्यक्ष आप्पासाहेब गरूड यांचा समावेश आहे.

कारखाना कार्यक्षेत्रातील गट व गावांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. तर विरोधी गटाकडून अद्याप उमेदवारी अर्ज दाखल झालेले नाहीत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 24 जून ही शेवटची तारीख आहे. या कालावधीत ते अर्ज दाखल करतील. दरम्यान केवळ विरोधाला विरोध करण्यासाठी राजाभाऊ पाटील ही निवडणूक लढवत असल्याची चर्चा मतदार संघात आहे.
दक्षिणेत निवडणुकांची रणधुमाळी ..

माजी मंत्री स्व. विलासराव पाटील यांचा आदर्श मानून कार्यरत असणार्‍या बहुतांश सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. त्यामध्ये उंडाळे सोसायटीची निवडणूक झाली आहे. नव्याने शामराव पाटील पतसंस्था 2 जुलै, रयत सहकारी साखर कारखाना निवडणूक 24 जुलै रोजी होत आहे. त्या पाठोपाठ कराड तालुका खरेदी विक्री संघ व बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू होईल.

बुधवारी दाखल झालेले अर्ज…
बुधवारी तिसर्‍या दिवशी 22 उमेदवारी अर्ज दाखल झाले. यामध्ये विद्यमान चेअरमन अ‍ॅड. उदयसिंह पाटील, व्हा.चेअरमन आप्पासाहेब गरूड यांच्यासह बाजीराव शेवाळे, पी. बी. शिंदे, वसंत देसाई, जयवंत मोहिते, जयवंत बोंद्रे, शंकरराव लोकरे, अर्जून पवार, प्रशांत पाटील, शेखर देशमुख, आनंदराव पाटील, रमेश चव्हाण, प्रदीप पाटील, हिंमतराव पाटील, अजयसिंह थांरात, प्रदीप दत्तात्रय पाटील, शालन पाटील, विजया माने, शशिकांत साठे, जगन्नाथ माळी, तुकाराम काकडे यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news