अबब ! थोरात गट चक्क शिक्षक समितीसोबत

अबब ! थोरात गट चक्क शिक्षक समितीसोबत
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा : प्राथमिक शिक्षक बँकेसाठी अर्ज माघारीचा कालावधी संपल्यानंतर युत्याआघाड्यांचे निश्चित झाले आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी शिक्षक संघााची तीन शकले पडली आहे. संघातील संभाजीराव थोरातांचा गट हा शिक्षक समितीसोबत गेला असल्याची खात्रीलायक माहिती आहे तर सिध्देश्वर पुस्तके आणि शिवाजीराव पाटील हे गट एकत्र आले आहे. तर बहुतांश छोट्या गटांनी पुस्तके गटाला पाठिंबा दिल्याचे समजते. संघाचा गट समितीसोबत गेल्यानंतर बंडखोरी उफाळणार आहे.

सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी असणार्‍या प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. बँकेच्या मतदानासाठी अवघ्या 15 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आता राजकीय हालचालींना गती आली आहे. अर्ज माघारी घेतल्यानंतर कोण कोणासोबत गेले आहे याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

पूर्वी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेसाठी शिक्षक संघ व शिक्षक समिती यांच्यात लढत व्हायची. आता मात्र, शिक्षक संघाचे राज्याचे नेतृत्व करत असल्याचा दावा करणारे संभाजीराव थोरात यांचा गट संपूर्ण राज्यात पारंपारिक विरोधक असलेल्या शिक्षक समितीसोबत गेला आहे. 21 पैकी शिक्षक समितीने स्वत:ला 13 जागा घेतल्या असून संभाजीराव थोरात गटाला फक्त 7 जागा दिल्या आहेत तर दोंदे गटालाही समितीने एक जागा दिली आहे. त्यामुळे थोरातांचा संघातील एक गट, दोंदे आणि समिती एकत्र पॅनल करून निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सत्ताधारी सिध्देश्वर पुस्तके यांच्या गटाला माजी आमदार शिवाजीराव पाटील यांची साथ मिळाली आहे. शिवाय डीसीपीएस संघटना (जुनी पेन्शन), महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ यांनाही पुस्तके यांनी जागा दिल्या आहेत. त्यामुळे तेही पुस्तके यांच्या गटासोबत आहेत. बहुजन शिक्षक संघ, कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिक्षक भारती यांनीही सिद्धेश्वर पुस्तके गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे समितीविरूद्ध शिक्षक संघ अशी लढत होणार आहे. त्याचवेळी गणेश दुबळे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी परिवर्तन पॅनलने 12 ठिकाणी उमेदवार दिल्याने संपूर्ण जिल्ह्यात बहुतांश जागांवर तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.

स्वाभिमानी परिवर्तन पॅनल प्रथमच निवडणूक रिंगणात उतरल्याने शिक्षक बँकेची निवडणूक रंगतदार होणार आहे. यंदाची निवडणूक ही वेगळीच ठरण्याची चिन्हे सुरूवातीपासूनच दिसून येत होती. त्याची पहिली झलक आज पहावयास मिळाली. संभाजीराव थोरातांचा गट समितीसोबत गेल्यानंतर संघाच्या उर्वरित दोन्ही गटांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात शिक्षक संघ आणि समितीची ताकत आहे. त्यातच थोरात गट समितीला जावून मिळाल्याने समितीची ताकत आणखी वाढणार असल्याचा दावा समितीकडून केला जात आहे. त्याचवेळी समितीमध्ये या निर्णयामुळे काही ठिकाणी फूटही पडली आहे. त्यामुळे थोरातांचा समितीसोबतचा घरोबा 'कही खुशी कही गम' असा समितीसाठी ठरला आहे.

संघाचे दोन गट आणि छोटे गट पुस्तकेंना येवून मिळाल्याने त्यांच्याही ताकतीत आणखी भर पडली आहे. त्यातच सिद्धेश्वर पुस्तके यांनी स्वत:च्या गटातील अंतर्गत मतभेद मिटवत अनेक ठिकाणी एकझुट कायम ठेवली आहे. त्यामुळे यंदाची निवडणुक ही चुरशीची
होणार आहे. दि. 19 रोजी शिक्षक बँकेसाठी मतदान होणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष आहे.

उदय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिक्षक समितीने संभाजीराव थोरातांना सोबत घेतलेला निर्णय शिक्षक सभासदांच्या पचनी पडणार का? मतदारांसमोर जाताना कोणता मुद्दा घेवून ते जाणार? शिक्षक संघाचे संस्थापक माजी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या गटाने मच्छिंद्र ढमाळ, तुकाराम कदम यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघाचाच सातारा जिल्ह्यातील प्रबळ गट असलेल्या सिद्धेश्वर पुस्तके यांच्या सोबत जाण्याचा घेतलेला निर्णय सभासदांना पचनी पडणार का? सत्ताधारी म्हणून सिद्धेश्वर पुस्तके, माजी चेअरमन राजेंद्र घोरपडे व त्यांच्या सहकार्‍यांनी बँकेत घेतलेले धोरणात्मक निर्णय सभासदांना आकर्षित करणार का? आणि या दोन्ही पॅनलविरोधात गणेश दुबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच रिंगणात आलेल्या स्वाभिमानी परिवर्तन आघाडीचा करिष्मा चालणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news