

सातारा : जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून समजल्या जाणार्या सातारा जिल्हा परिषदेचे मैदान दिवसेंदिवस उकीरडा बनू लागले आहे. जिकडे-तिकडे कचर्याचे ढीग दिसत असल्याने मैदानाला बकाल स्वरूप आले आहे. तसेच मद्यपींचाही वावर वाढल्याने ठिकठिकाणी दारूच्याही बाटल्या दिसू लागल्या आहेत. तसेच प्रेमी युगुलही मैदानातील सावलीचा आधार घेत गप्पांचे फड रंगवत आहेत. अधिकार्यांनी मैदानाकडे कानाडोळा केल्यानेच मैदानाला अवकळा आली आहे.
झेडपी मैदान परिसरात कचर्याचे ढिगच्या ढिग पडले आहेत. तर काही ठिकाणी कचरा अस्ताव्यस्त पसरला आहे. जॉगिंग ट्रॅकवरही प्रचंड अस्वच्छता झाली आहे. त्यामुळे या ट्रॅकवरून नागरिक व विद्यार्थ्यांना चालणेही मुश्किल झाले आहे.
नेहमी स्वच्छतेत देशात व राज्यात नावलौकिक मिळवणार्या सातारा जिल्हा परिषदेचेच मैदान अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने स्वच्छ भारत अभियानालाही हरताळ फासला आहे.
मैदानात झाडे बसण्यासाठी सिमेंटची बाक असल्याने मद्यपी कायम या ठिकाणी असतात. त्यामुळे झेडपी मैदान ओपन बार झाला आहे. याचबरोबर मैदानावर प्रेमी युगुलांचाही वावर वाढला आहे. मैदानावरील झाडांच्या सावलीत ही युगुले गप्पांचे फड रंगवत आहे अन् तेथेच कचराही करत आहेत. अशा गैर व्यवस्थांच्या कोंडाळ्यामध्ये अडकलेल्या या मैदानामध्ये खेळणे, मार्निंक वॉक करणे सर्वसामान्यांसाठी जिकिरीचे झाले आहे.मैदान देखभाल व स्वच्छतेसाठी लाखो रूपये खर्च करूनही मैदानाचा उकीरडा झाल्याने स्वच्छतेचे पैसे मुरतात तरी कुठे? असा सवाल केला जात आहे.
जिल्हा परिषद मैदान परिसरात शाळा व महाविद्यालये, अॅकॅडमी, क्लासेस आहेत. हा परिसर दुपारच्या वेळी निर्मनुष्य असतो. त्यामुळे हा परिसर प्रेमी युगुलासाठी सुरक्षित आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रेमीयुगले तासन्तास गप्पा मारत बसत असल्याचे चित्र आहे. अनेकदा अश्लिल चाळेही करताना निदर्शनास आले आहे. काहीवेळा वादावादीचे प्रसंगही या ठिकाणी घडले आहेत.