Balasaheb Patil: झेडपी निवडणुका शरद पवार गट स्वबळावर लढणार

जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील : जिल्ह्यात पक्ष संघटन वाढीवर भर राहणार
Balasaheb Patil
Balasaheb Patil: झेडपी निवडणुका शरद पवार गट स्वबळावर लढणारPudhari Photo
Published on
Updated on

सातारा : सातारा जिल्ह्यातील सामान्य जनता ही राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खा. शरद पवार यांच्या विचारांना मानणारी आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये पवारसाहेबांचा विचार सुप्तपणे मनात धरुन ठेवलेली जनता, कार्यकर्ते पुढे येतील त्यांना आम्ही ताकद देणार आहोत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष स्वबळावर लढेल, अशी घोषणा पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

बाळासाहेब पाटील म्हणाले, जिल्ह्यात पक्षसंघटन कसे वाढवायचे याची चर्चा राष्ट्रवादी भवनात घेतलेल्या मेळाव्यात करण्यात आली. आगामी काळात जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जायचे आहे. दि. 12 डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस आहे, त्याचे नियोजनदेखील करायचे आहे. राष्ट्रवादीचा विचार पुढे नेण्याची आमच्यावर जबाबदारी आहे. जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार तळागाळात नेण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करु.

जिल्ह्यात पक्षसंघटन वाढीसाठी काय प्रयत्न केले जाणार? याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष पूर्वीपासून निश्चित मोठा पक्ष ठरला आहे. मधल्या काळात काही घडामोडी घडल्या असल्या तरी जिल्ह्यातील जनता ही शरद पवारांनाच मानते. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्यात राहून काम करणारे कार्यकर्ते एकत्र येतील. आमचे पक्षसंघटन निश्चिपपणे मजबूत होईल.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कराड नगरपालिकेचा पॅटर्न राबवणार का? या प्रश्नावर पाटील म्हणाले, राज्यातील सर्वच नगरपालिकांच्या निवडणुका बहुतांश पक्षांच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक आघाडीच्या माध्यमातून लढल्या. आगामी काळातही स्थानिक परिस्थिती बघून आघाड्या केल्या जातील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरच पुढे जाणार आहे. पक्ष चिन्हावरच निवडणुका लढवल्या जातील. त्या-त्या परिस्थितीवर निर्णय होतील. आमच्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार उभे राहतील, यासाठी आम्ही प्रयत्न करु.

अजितदादांसोबत एकत्र येवून गेलेले वैभव पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न होईल का? या प्रश्नावर बाळासाहेब पाटील म्हणाले, जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरण्याची आमची मानसिकता आहे. पक्ष संघटन वाढवण्यावर आमचा भर राहणार आहे. कराड पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला सोबत घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपविरोधात समविचारी पक्षांनी चिन्हावर लढण्याचा आग्रह धरला. यापूर्वी कराडात आम्ही पक्ष चिन्हावर निवडणुका लढल्या नव्हत्या. तरीही काँग्रेसने 13 उमेदवार उभे केले.

दरम्यान, कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना बाळासाहेब पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी दिलेली जबाबदारी ही यशस्वीपणे सांभाळेन, पक्ष भक्कम करण्याचे उद्दीष्ट डोळ्यांसमोर ठेवूनच सर्वांनी कामाला लागले पाहिजे, सर्वांनी एकदिलाने काम करून पक्षाची भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, त्यासाठी योग्य नियोजन करु.

यावेळी शफिक शेख, राजकुमार पाटील, नरेश देसाई, नागेश साळुंखे, राजाभाऊ निकम, सचिन जाधव, नौमान बागवान, अतुल शिंदे, मालोजीराव पाटणकर, समीर घाडगे, किरण चौधरी, निलेश जगदाळे, सागर झणझणे, विक्रांत शिर्के, संतोष पाटील, दयानंद नागटिळक, सौ. संगीता साळुंखे, सौ. समिंद्रा जाधव, सौ. वैशाली जाधव, सौ. अर्चना देशमुख, सौ. तेजस्वीनी केसरकर, सौ. उषा जाधव, सौ. नलिनी जाधव, सौ. अल्का घाडगे, पूजा बनसोडे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news