

सातारा : जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका गेल्या 3 वर्षांपासून खोळंबल्या आहेत. या निवडणुकीसाठी इच्छुकांसह राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. झेडपीची मुदत संपल्यानंतर नव्याने 73 गटांची प्रभाग रचना करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुढे कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे जुन्याच गटांवर निवडणूक होणार की नवीन प्रभागरचनेनुसार निवडणूक होणार? असा सवाल केला जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण मिळण्याबाबतच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात अजूनही निकाल लागलेला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक रखडली आहे. सातारा जिल्हा परिषदेवर मार्च 2022 पासून प्रशासक राजवट सुरू आहे. त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत. तसेच 11 पंचायत समित्यांचा कारभारही प्रशासकाकडे असून कामकाज गटविकास अधिकारी पाहत आहेत.
3 वर्षे प्रशासक राजवट सुरू असली तरी सर्वोच्च न्यायालयातील निकाल लागल्याशिवाय निवडणुका जाहीर होणार नाहीत हे स्पष्ट आहे. तरीही सत्ताधार्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महायुती सरस ठरली आहे. भाजपचे 4, शिवसेना शिंदे गट 2, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे अगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महायुतीचा करिष्मा पहावयास मिळणार आहे.
जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीतच इच्छूकांनी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये साखर पेरणी केली आहे. इच्छूकांनी आपआपल्या भागातून विधानसभा निवडणूकीत चांगले मताधिक्कय दिले आहे. त्यामुळे अगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, पूर्वी जिल्हा परिषदेचे 67 गट होते. त्यानंतर अनेक तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायती झाल्या. तसेच काही भाग शहराच्या हद्दीत समाविष्ट झाला. त्यामुळे 10 वर्षात गटांची संख्या 64 वर आली होती. तर महाविकास आघाडीच्या काळात या जि.प. गटांची संख्या वाढून 73 वर गेली आहे. तर पंचायत समिती गणाची संख्या 146 वर गेली आहे. नवीन रचनेनुसार कराड, खटाव व फलटण तालुक्यात प्रत्येकी 2 गट व 4 गण वाढले. तर वाई, पाटण, कोरेगावमध्ये प्रत्येकी एक गट आणि दोन गणात वाढ झाली. 45 जागा खुला वर्ग, 19 जागा ओबीसी, 8 जागा अनुसूचित जाती, 1 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. एकूण 73 जागापैकी 37 गट महिलांसाठी राखीव आहेत. प्रभाग रचना व आरक्षण सोडत झाली आहे. मात्र, आता यालाही बराच कालावधी लोटून गेला आहे. त्यामुळे नवीन गटांनुसार निवडणूक होणार की जुन्याच गटांवर निवडणूक होणार, याबाबत इच्छुकांमध्ये संभ्रमावस्था आहे.
सातारा तालुक्यात 10 गट व 20 गण, कराड तालुक्यात 14 गट व 28 गण, वाई तालुक्यात 5 गट व 10 गण, महाबळेश्वर तालुक्यात 2 गट व 4 गण, माण तालुक्यात 5 गट व 10 गण, खटाव तालुक्यात 8 गट व 16 गण, कोरेगाव तालुक्यात 6 गट व 12 गण,जावली तालुक्यात 3 गट व 6 गण, खंडाळा तालुक्यात 3 गट व 6 गण, पाटण तालुक्यात 8 गट व 16 गण,फलटण तालुक्यात 9 गट व 18 गण आहेत. नवीन रचनेनुसार जि.प. गटांची संख्या 73 व गणांची संख्या 146 वर पोहोचली आहे.