

सातारा : जिल्हा परिषद सत्तास्थापनेचा निर्णय कधी होईल, याची मलाही उत्सुकता आहे. या चर्चेवर कधी पडदा पडणार, हे ठामपणे काही सांगू शकत नाही. ना. मकरंद पाटील आणि आम्ही भूमिकेवर ठाम आहोत. भाजपची दिग्गज मंडळी आहेत, काहीही झाले तरी भाजपचाच अध्यक्ष होईल या त्यांच्या वक्तव्यावर कसं बोलावं याची भीती वाटते. आमची छोटं वाक्य बोलले, तरी दुसरा पालकमंत्री नेमला जातो. त्यांचा कसा अध्यक्ष होईल, हे त्यांनाच विचारा, असा खोचक टोला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ना. जयकुमार गोरे यांना लगावला.
पाटण येथे दि. 2 ते 6 एप्रिल या कालावधीत राज्यस्तरीय डोंगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ना. शंभूराज देसाई म्हणाले, आम्ही एकत्र लढलो त्यावेळी मोठा मित्र पक्ष आमच्यासोबत आला नाही. आम्ही पूर्वी एकत्र आल्यामुळे सत्तास्थापनेवेळी एकत्र राहायचं असं ठरलं आहे. झेडपी पाच वर्षे काम करायचे असल्याने सदस्य म्हणतील त्यानुसार विचार करावा लागेल. त्यांचे मत महत्त्वाचे वाटते. सत्तास्थापनेबद्दल मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही.
पालकमंत्री म्हणून मी खूप सावध पावले टाकतोय. नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीवेळी वेगळा अनुभव आला. निर्णय काय व्हायचा तो होतो पण बैठकीला चर्चेसाठी आपण जातो. मात्र ते न आल्यामुळे हा अपमान मी मोठ्या मनाने गिळला. शिवसेनेच्या पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद सदस्यांना व्हीप बजावण्याचा अधिकार पक्षाने मला दिले आहेत. भाजपचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होईल, या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याकडे लक्ष वेधले असता ना. देसाई यांनी त्यांचा अध्यक्ष कसा होणार हे मला माहित नसून त्यांनाच तुम्ही विचारा, असा टोला हाणला.
दरम्यान, राज्याच्या डोंगरी महोत्सवाचे आयोजन दि. 2 एप्रिल ते 6 एप्रिल दरम्यान करण्यात आले आहे. यावर्षी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्यावतीने हा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. पाटण तालुक्यातील शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिवादन केल्यानंतर मर्दानी खेळाचे कार्यक्रम होणार आहेत. राज्यातील सुप्रसिद्ध शाहीर छत्रपती शिवरायांवरील पोवाडे सादर करणार आहेत. त्यानंतर विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. त्यामध्ये कृषी प्रदर्शन, पशुपक्षी प्रदर्शन, महिला गटाचे प्रदर्शन, बोटिंग, इलेक्ट्रीक बग्बी राईड, हाऊस राईड कॅमल राईड, ड्रोन व लेझर शो, बँड पथकांच्या स्पर्धा, भजनी मंडळ स्पर्धा, पॅराग्लायडिंग होणार आहे.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत एका दिवसाचा पारंपरिक लावणी महोत्सव होणार आहे. समारोपाच्या दिवशी होणाऱ्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमापूर्वी मराठी बाज असणारी शोभायात्रा होणार आहे. दि. 6 रोजी हिंदी-मराठी कार्यक्रम होणार आहे, असेही ते म्हणाले.