

सातारा : साताऱ्यात टोळीयुद्धातून रेकॉर्डवर असलेला वृषभ राजेंद्र जाधव (28, रा. रविवार पेठ, सातारा) या युवकाचा कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. करंजेतील आंदेकर चौकात हल्ला केल्यानंतर पुन्हा मंगळवार पेठेतील एका आळीत नेन मर्डर केल्याचे समोर आले आहे. या क्रूर घटनेने सातारा हादरला असून सिव्हिलसह ठिकठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनास्थळावरून मिळालेली प्राथमिक अशी, गुरुवारी भरदुपारी 1 च्या सुमारास ही घटना घडली. वृषभ हा करंजे येथे कामानिमित्त गेला होता. यावेळी दबा धरून बसलेल्या टोळक्याने वृषभ याच्यावर कोयत्यासारख्या शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात वृषभ याच्या हात व पायाला जबर दुखापत झाली. यामुळे तो पळू शकत नसल्याचे पाहून हल्लेखोरांनी त्याला दुचाकीवर बसवून मंगळवार पेठेतील एका आळीत नेले. तेथे पुन्हा हल्लेखोरांनी व इतर हल्लेखोरांनी हल्ला चढवला. प्राथमिक माहितीनुसार वृषभ याच्या हाता, पायावर, डोक्यावर अनेक सपासप वार करण्यात आले आहेत. हल्लेखोरांनी हल्ला केल्यानंतर तेथून ते पसार झाले.
वृषभ जाधव याला मंगळवार पेठेत जखमी अवस्थेत नेल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिस मंगळवार पेठेत पोहचले. वृषभ हा गंभीर जखमी अवस्थेत पोलिसांना दिसला. रुग्णवाहिका बोलावून पोलिसांनी त्याला उपचारासाठी हलवले. तसेच हल्लेखोर तेथे कुठे आहेत का? याची शोध मोहीम पोलिसांनी राबवली. मात्र पोलिसांच्या हाती हल्लेखोर सापडले नाहीत.
वृषभ जाधव याच्या टोळीचे गेल्या काही वर्षापासून दुसऱ्या टोळीसोबत वाद होता. वर्चस्ववादासह इतर अनेक कारणांची त्याला झालर आहे. कारागृहातील भांडणे, जाधव याच्या मित्राला झालेल्या खुनाचा बदला घेणे अशी कारणे आहेत. दोन टोळ्यांमध्ये वारंवार वादविवाद होत होते. कमालीची खुन्नस त्यांच्यामध्ये होती. पूर्ववैमनस्यातूनच हा खून झाल्याचे समोर येत आहे.
वृषभ जाधव याच्यावर हल्ला झाल्याचे त्याच्या साथीदारांना समजल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. सिव्हीलमध्येही शेकडो युवक थांबून होते. दुसरीकडे पोलिसांनी हल्ल्याची नेमकी माहिती तसेच संशयित आरोपींची माहिती घेवून तपास पथके तयार करुन रवाना केली. रात्री उशीरापर्यंत वृषभ याच्या खून प्रकरणी त्याचा चुलत भाऊ शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार देत होता. तोपर्यंत संशयित आरोपी देखील पोलिसांच्या हाती लागले नव्हते.