

वडूज : पेडगाव (ता. खटाव) येथे दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत येथील एकाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झाला.
सुहास राजेंद्र गुजले (वय, 27, रा. वडूज) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सुहास व अमर अंकुश पाटोळे हे शुक्रवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास पेडगाव येथे सुनील मोरे यांच्या घराजवळ रूपेश संतोष पाटोळे याची रिक्षा पंक्चर झाल्याचे समजल्याने दोघे दुचाकी (क्र. एम.एच.11 बी.क्यू. 435) वरून गेले होते. त्याठिकाणी त्यांना रिक्षा न दिसल्याने त्यांनी पाटोळे यास रिक्षा कुठे आहे याबाबत विचारणा केली. त्यावेळी रिक्षा वडूज येथे सुमित मोरे यांच्या घराजवळ असल्याचे समजले. त्यामुळे ते दोघेही सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास परत वडूजकडे येऊ लागले असता पेडगावच्या हद्दीत देवदास कुंडलीक मिसळे यांच्या जमिनीजवळ आल्यानंतर वडूजहून पेडगावच्या दिशेने येणारी दुसरी दुचाकी (क्र.एम.एच.11 सी.टी. 1578) वरून दशरथ नवनाथ जाधव (रा. पेडगाव) हा भरधाव वेगात येत होता.
जाधव याच्या दुचाकीने गुजले यांच्या दुचाकीस समोरून जोराची धडक दिली. त्यामध्ये गुजले हा गंभीर जखमी होऊन बेशुध्द झाला. तर पाटोळे व जाधव हे दोघेदेखील जखमी झाले होते. गुजले याला उपचारासाठी येथील श्री दत्त हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याच्यावर औषधोपचार सुरू असताना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याबाबत अमर पाटोळे याने दशरथ जाधव याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. तपास पोनि घनश्याम सोनवणे करत आहेत.