

पाटण : महाराष्ट्रसह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या येराड येथील श्री येडोबा देवाच्या वार्षिक यात्रेस शनिवारपासून सुरुवात झाली. पाच दिवस चालणार्या यात्रेच्या पहिल्या दिवशी गुलाल, खोबर्यांची उधळण करत रविवार दि. 13 रोजी छोटा छबिना मोठ्या उत्साहात पार पडला. या छबिन्यात मानाच्या सासनकाठ्या सहभागी झाल्या होत्या. ‘येडोबाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात पहाटे श्री जोगेश्वरी देवी व येडोबा देवाचा विवाह सोहळा उत्साहात पार पडला.
दरम्यान, सोमवार दि. 14 रोजी मुख्यदिवशी मोठा छबिना असल्याने यात्रेसाठी हजारोंच्या संख्येने भाविकभक्त श्री क्षेत्र येराड येथे दाखल झाले आहेत. श्री क्षेत्र येराड येथून देवाचे मानकरी नेरळे गावी या विवाह सोहळ्यातील श्री येडोबा देवाची कुरवली असलेल्या श्री जानुबाई देवीला आणण्यासाठी मुराळी म्हणून गेले. रात्री वाजत गाजत जानुबाई देवीला घेऊन आले. आज पहाटे कोयना नदी काठावर असलेल्या श्री क्षेत्र येराड येथे विवाह सोहळा पार पडला. सकाळी 10 वाजता मानकर्यांसह भाविकांच्या नैवद्याचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी 1.30 वाजता छोट्या छबिन्यास सुरुवात झाली. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व नगर जिल्ह्यातील सासनकाठ्यासह कर्नाटक राज्यातील सासनकाठ्या श्री येडोबा व श्री जोगेश्वरी देवी यांच्या पालख्या मंदीर प्रदक्षिणेस निघाल्या की छबिन्यास सुरुवात होते. छबिन्यात मांजरी, देवराष्ट्र, नगर, मंगळवेढा, वाटेगाव, मसूर, पेठनेर्ले, कांबिरवाडी, विंग, नांदलापूर, कोळेवाडी, दगडवाडी, काळमवाडी, शेनवडी, मायणी, तासवडे, मानेवाडी (खटाव), येवलेवाडी (कडेगाव) आणि नेरळे, सुरुल, धावडे, झाकडे व नाटोशी अशा सासनकाठ्या सहभागी झाल्या होत्या.
दरम्यान, पाटणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील, पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, महसूल विभागासह देवस्थान व यात्रा कमेटीचे सदस्य परिश्रम घेत आहेत.
पारंपरिक वाद्याच्या गजरात छबिना मंदिर प्रदक्षिणा घालत असताना येडोबाच्या नावान चांगभल करीत भाविकांनी गुलाल खोबर्याची उधळण केली. मंदिरास प्रदक्षिणा पूर्ण करुन छबिना पुर्वेकडील श्री नाईकबा मंदिरात नाईकबा देवाच्या भेटीला गेला. भेटीचा कार्यक्रम झाल्यानंतर छबिना विसर्जित झाला. सोमवार दि. 14 रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून दुपारी 12.45 वाजता मोठा छबिना व धारेचा धार्मिक कार्यक्रम होणार आहे.