

कराड : फलटण येथील यशवंत बँक कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मुख्य संशयित व सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना अटक झाल्यानंतर तपास यंत्रणांनी चौकशीचा व्याप वाढविला आहे. या प्रकरणात सुमारे 112 कोटी रुपयांच्या व्यवहारांबाबत अनियमिततेची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, विविध स्तरांवरील कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. मुख्य आरोपीच्या अटकेमुळे अन्य संचालक व अधिकारी धास्तावले आहेत.
या प्रकरणात मुंबई येथे प्रवर्तन संचालनालय (ईडी) यांनी स्वतंत्र गुन्हा नोंदविल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच सातारा येथील आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडूनही तपास सुरू असून, 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2025 या कालावधीत झालेल्या व्यवहारांची छाननी करण्यात येत आहे. विशेषतः मागील काही वर्षांतील कर्जमंजुरी प्रक्रिया, तारण कागदपत्रे, निधीची वर्गवळत आणि अंतर्गत नियंत्रण यंत्रणेतील बाबींचा सखोल आढावा घेतला जात आहे.
तक्रारीनुसार, काही कर्ज प्रकरणांत मंजूर निधीचा वापर वेगळ्या प्रकल्पांकडे वळविण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दूध संघ, प्रक्रिया उद्योग, कृषी संबंधित उद्योग तसेच बांधकाम क्षेत्रातील व्यवहारांचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. तथापि, या सर्व बाबींची अधिकृत पुष्टी तपासानंतरच होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
तपास यंत्रणांकडून कर्जखाती उघडण्याची पद्धत, मंजुरीचे स्तर, संचालक मंडळाची भूमिका आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी यांचा परस्पर संबंध तपासला जात आहे. काही प्रकरणांत कथित बोगस कर्जखाती उघडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, संबंधित डिजिटल नोंदी आणि लेखापरीक्षण अहवालांची पडताळणी सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात19 जणांना उच्च न्यायालये तात्पुरता जामीन दिला आहे. उर्वरीत 15 संशयीत आरोपींनी अद्याप काणत्याची न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलेला नाही. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होवू शकते, अशी परिस्थिती आहे.