

कराड : कराड येथील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये तब्बल 112 कोटी 10 लाख 57 हजार 481 रुपयांचा अपहार झाल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी बँकेचे चेअरमन, संचालक, अधिकारी अशा एकूण 50 जणांविरुद्ध कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सीए मंदार शशिकांत देशपांडे (वय 40, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणामुळे सातारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सूचनेनुसार सीए मंदार देशपांडे यांनी यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेचे लेखापरीक्षण केले. त्यावेळी हा अपहार व फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे त्यांनी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशानुसार 11 ऑक्टोबर 2025 रोजी पोलिसांत तक्रार नोंदवली.
सीए मंदार देशपांडे यांनी केलेल्या लेखापरीक्षणा दरम्यान उघड झाले की, 9 ऑगस्ट 2014 ते 31 मार्च 2025 या कालावधीत बँकेच्या आर्थिक व्यवहारात गंभीर गैरव्यवहार झाले. बोगस कर्ज प्रकरणे दाखल करून, खोटी कागदपत्रे तयार करून तारणाशिवाय कर्ज वितरण, जुनी थकबाकी खाती बंद दाखवून नवीन खाती उघडणे, तसेच निधीचा तृतीय पक्षांकडे उद्देश बाह्य विनियोग करण्यात आला. या सर्व व्यवहारांद्वारे बँकेच्या निधीचा मोठ्या प्रमाणावर अपहार व गैरवापर करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणात चेअरमन शेखर सुरेश चरेगावकर यांच्यासह संचालक मंडळातील एकूण 36 सदस्य, पाच सेवक कर्मचारी, चेअरमन यांचे नातेवाईक आणि संबंधित अधिकृत केेलेल्या 9 व्यक्ती अशा एकूण 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे करत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी तपासाबाबत सूचना केल्या आहेत.