

सातारा : 'आपण ठीक आहोत' हे वाक्य आज अनेकांच्या आयुष्यातील मुखवटा बनत चालले आहे. बाहेरून आनंदी आणि समाधानी दिसणाऱ्या अनेक व्यक्ती मानसिक तणाव, चिंता आणि नैराश्याशी झुंज देत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगातील सुमारे आठपैकी एक व्यक्ती मानसिक आरोग्याच्या समस्येचा सामना करत आहे. महाराष्ट्रातही परिस्थिती चिंताजनक असून राज्यातील एक कोटींच्या घरात नागरिक विविध स्वरूपांच्या मानसिक आरोग्यविषयक समस्यांनी त्रस्त आहेत. कोरोनानंतर वाढलेली चिंता, नैराश्य, कामाचा ताण आणि सामाजिक एकटेपणा यामुळे मानसिक आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
स्पर्धात्मक जीवनशैली, कामाच्या ठिकाणचा तणाव, कौटुंबिक कलह, आर्थिक अडचणी आणि सामाजिक अपेक्षांचा दबाव यांमुळे मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. तरुण आणि लहान मुलांमधील वाढता तणाव चिंतेचा विषय बनला आहे. शैक्षणिक स्पर्धा, करिअरविषयक अनिश्चितता आणि बदलती जीवनशैली यांचा मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होत आहे. मात्र, मानसिक आरोग्याबाबत समाजात असलेला संकोच आणि गैरसमज यांमुळे अनेकजण वेळेवर उपचार घेण्यास पुढे येत नाहीत.
गेल्या तीन वर्षांत राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये आणि प्रादेशिक मनोरुग्णालयांमध्ये मानसिक आरोग्यविषयक उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य सेवांचा विस्तार, तज्ज्ञांची उपलब्धता आणि समुपदेशन सुविधांना बळकटी देण्याची गरज अधोरेखित होत आहे. सध्याच्या घडीला राज्य सरकारकडून पुणे, ठाणे, नागपूर आणि रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयांसह जिल्हा रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मानसिक आरोग्य उपचारांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.