

भुईंज : चांदक, ता. वाई येथील परिसरात भरदिवसा ओम्नी कारमधून चोरीस गेलेल्या 6 लाख 28 हजार 200 रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा छडा लावण्यात भुईंज पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणात पोलिसांनी बांधकाम मजुराला अटक करून सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
अमोल भगवान दरेकर (वय 40, रा. चांदक) असे संशयिताचे नाव आहे. दि. 13 रोजी दुपारी चांदक गावात एक ओम्नी कार उभी होती. या कारमधील पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या पर्समध्ये साडेपाच तोळे सोन्याचे दागिने आणि चांदीच्या वस्तू असा एकूण 6 लाख 28 हजार 200 रुपयांचा ऐवज होता. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पथकाने परिसरात चौकशी केली असता जवळच घराचे बांधकाम सुरू असून काही मजूर काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संशयावरून पोलिसांनी अमोल दरेकर या मजुराला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अमोलने पोलिसी खाक्या दाखवताच अखेर गुन्ह्याची कबुली दिली. संशयित अमोलने चांदक-वेळे रोडवरील स्मशानभूमीजवळील एका मोठ्या दगडाखाली चोरीचे दागिने लपवून ठेवले होते. पोलिसांनी त्या ठिकाणाहून सोन्याचे मोठे मंगळसूत्र, चार सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे डोरले व 11 अष्टपैलू मणी, चांदीचे ब्रेसलेट तसेच चोरीला गेलेली पर्स असा सर्व मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई सपोनि पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, सुरज शिंदे, पोलीस हवालदार नितीन जाधव, आप्पा कोलवडकर, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते आणि किरण निंबाळकर यांनी केली.