

उंब्रज : अंधारवाडीसह शिवडे परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलांना तीन संशयितांनी चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील साडेसात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हिसकावून संशयितांनी पळ काढला आहे.
याबाबत मनीषा शहाजी कदम (45, रा. उंब्रज, ता. कराड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या सकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास मैत्रीण रोहिणी मारुती साळुंखे यांच्या समवेत उंब्रज ते अंधारवाडी रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. त्यावेळी अंधारवाडी गावच्या कमानी परिसरातील वळणावर दुचाकीवरून मास्क लावलेले तीन संशयित त्यांच्या पुढे आले. काही समजण्यापूर्वीच संशयितांनी चाकूचा धाक दाखवित मारहाण केली आणि दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण हिसकावून पोबारा केला. या घटनेवेळी मनिषा यांच्या हाताला चाकू लागला आहे.
अशीच दुसरी घटना सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुणे - बंगळूर महामार्गालतच्या उंब्रज ते शिवडे दरम्यान सेवा रस्त्यावर घडली आहे. अपूर्वा आकाश अर्जुगडे व सुनिता विजय अर्जुगडे या मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. त्यांनाही तिघा संशयितांनी चाकूचा धाक दाखवून मारहाण करन सुमारे साडेपाच तोळ्याचे सोन्याचे गंठण हिसकावून पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र भोरे करीत आहेत.