

लिंब : कृष्णा नदीत वाहून गेलेल्या गोवे ता. सातारा येथील महिलेचा मृतदेह पुलापासून तीनशे मीटर अंतरावर एनडीआरएफच्या टीमला सापडला.
गोवे येथील उज्वला दीपक जाधव ( वय 40) या देवाला जाते असे सांगून घरातून निघून गेल्या होत्या. त्या गोवे - लिंब दरम्यानच्या जुन्या पुलावरून जात असताना पुलावरील पाण्यात घसरून पडल्या. नदीच्या प्रवाहात त्या वाहून गेल्या होत्या. याबाबत पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दीपक तुकाराम जाधव यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून शोध सुरु होता. मात्र त्यांचा शोध लागत नसल्याने सातारा तालुका पोलिसांनी एनडीआरएफ टीमला कराडवरून पाचारण केले. या टीमला उज्वला जाधव यांचा मृतदेह गोवे गावच्या बाजूस पुलापासून तीनशे मीटर अंतरावर झाडात अडकलेल्या स्थितीत मृतदेह सापडला.
दरम्यान उज्ज्वला दीपक जाधव यांचा शोध घेणेकामी एनडीआरएफचे दोन अधिकारी, 22 जवान, देविदास ताम्हाणे, स.पो.नि. अनिल मोरडे, पो.हवा. कुमठेकर व पोलीस कर्मचारी सहभागी होते. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पो.नि. निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. आशिष कुमठेकर करत आहेत.