

फलटण : फलटण तालुक्यातील कणसे वस्ती, गुणवरे येथे दूध काढण्याच्या इलेक्ट्रिक मशिनचा विजेचा शॉक विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका तानाजी कर्णे (वय २८) या पती तानाजी ज्ञानबा कर्णे यांच्यासमवेत नेहमीप्रमाणे जनावरांच्या गोठ्यात म्हशीचे दूध काढण्यासाठी गेल्या होत्या. दूध काढून झाल्यानंतर मशिनला जोडलेल्या कॅनचे झाकण काढून ते गोठ्यातील विद्युत बोर्डाजवळ ठेवत असताना त्यांना अचानक विजेचा जोरदार शॉक बसला. प्रियंका यांनी आरडाओरडा केल्यानंतर पती तानाजी यांनी तत्काळ धाव घेऊन त्यांना विजेच्या संपर्कातून दूर केले. त्यानंतर त्यांना फलटण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. प्रियंका यांना अवघ्या सहा महिन्याचे बाळ आहे. या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.
पंधरा दिवसांत सहाजणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
फलटण तालुक्यात ८ जुलै रोजी खामगाव येथे विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील चारजणांचा मृत्यू झाला होता. त्याच दिवशी राजुरी येथेही एका व्यक्तीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. अवघ्या पंधरा दिवसांत विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सहावर पोहोचली आहे. या सलग घटनांमुळे महावितरणच्या विद्युत सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत असून अपघातामागे मानवी निष्काळजीपणा की विद्युत यंत्रणेतील त्रुटी याची सखोल चौकशी होण्याची गरज व्यक्त होत आहे.