

सातारा : उत्पादन शुल्क विभागात ओळख आहे. वाईन शॉपचा परवाना काढून देतो, असे सांगून तब्बल 1 कोटी 26 लाख रुपयांची फसवणूकप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांमध्ये एका डॉक्टरचाही समावेश असून संशयितांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सुधीर विठ्ठल राऊत (रा. पुणे), रुपेश राजाराम वंजारी (रा. कृष्णानगर, सातारा), डॉ. शरद दत्तात्रय कुंभार (रा. वडूज, ता. खटाव) अशी संशयीतांची नावे आहेत शर्मिला विजयकुमार खंदारे (रा. सदरबझार, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली अहे.
अधिक माहिती अशी, संशयित डॉ. शरद कुंभार यांनी शर्मिला खंदारे यांना वाईन शॉपचा परवाना पाहिजे असेल तर सांगा असे सांगितले. त्यासाठी ओळखीचे रुपेश वंजारी व सुधीर राऊत असून या दोघांच्या ओळखी मंत्रालय, मुंबई येथे असल्याचेही सांगितले. वाईन शॉपचा परवाना काढण्याबाबत जून 2024 मध्ये संशयित डॉ. शरद कुंभार, रुपेश वंजारी व सुधीर राऊत हे शर्मिला खंदारे यांंच्या घरी गेले. या बैठकीत परवान्याबाबतचा सर्व खर्च हा 1 कोटी 75 लाख सांगितला.
वाईन परवान्यासाठी अंतिम रक्कम निश्चित झाल्यानंतर सुधीर राऊत याला वेगवेगळ्या खात्यातून 5 लाखांची रक्कम आरटीजीएस केली. त्यानंतर वेळोवेळी एकूण 1 कोटी 26 लाख रुपये दिले. ठरलेली सर्व रक्कम संशयितांना दिल्यानंतर तक्रारदारांनी परवाना कधी येणार आहे अशी विचारणा केली असता परवाना लवकरच येईल असे आश्वासन दिले गेले.
फेब्रुवारी 2025 मध्ये संशयितांनी तक्रारदार खंदारेे यांच्या व्हॉट्सअॅपवर महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभाग यांचा शिक्का व भारतीय राजमुद्रा असलेले परवाना क्रमांक व तक्रारदार यांचे नाव असलेले पाबलो वाईन्स नावाच्या परवान्याची प्रत पाठवली. मात्र, पुन्हा त्यामध्ये अडचण आली असल्याचे सांगून संशयितांनी वेळ मागून घेतला. संबंधित परवानाबाबत खात्री केली असता ते बोगस असल्याचे समोर आल्याने अखेर तक्रारदार यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली व तक्रार दिली.
वाईनचे लायसन लवकरच मिळणार असल्याचे सांगून संशयितांनी तक्रारदार शर्मिला खंदारे यांना गाळा घेण्यासही सांगितले. त्यानुसार त्यांनी गाळा देखील सप्टेंबर 2024 मध्ये भाड्याने घेतला. त्याचे भाडेही यांनी भरले आहे. मात्र मोकळ्याच गाळ्याचे भाडे भरत असताना प्रत्यक्षात लायसन मिळाले नाही.