भाजप जिल्हाध्यक्षपद बदलाचे वारे

Satara BJP : अनेकांची प्रतिष्ठा पणाला; दावेदारांची वरिष्ठांकडे ‘फिल्डिंग’
BJP district president change
भाजपच्या आढावा बैठकीप्रसंगी खा. उदयनराजे भोसले, ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण व पदाधिकारी. pudhari photo
Published on
Updated on

सातारा : भारतीय जनता पक्षातर्फे सभासद नोंदणीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. आता लवकरच मंडलाध्यक्ष व जिल्हाध्यक्षांच्या निवडी होणार आहेत. भाजपमध्ये जिल्हाध्यक्षपद बदलाचे वारे घुमू लागले आहे. यासाठी अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, प्रमुख दावेदारांनी पदासाठी वरिष्ठांकडे फिल्डिंग लावली आहे.

जिल्हाध्यक्षपदासाठी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती सुनील काटकर, भाजप पंचायतराज आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष रणजित फाळके, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, किसान आघाडीचे रामकृष्ण वेताळ, साताराचे माजी शहराध्यक्ष विकास गोसावी यांची नावे आघाडीवर आहेत.

सुनील काटकर यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाने दिलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडली. पंचायतराज आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना रणजित फाळके यांनी जिल्ह्यासह राज्यपातळीवर पक्षाची बांधणी उत्तम पध्दतीने केली. जयकुमार शिंदे यांनी माढा लोकसभा व फलटण विधानसभा मतदारसंघात भाजपची चांगली बांधणी केली आहे. रामकृष्ण वेताळ हे तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीसाठी दावेदार होते. सातारा शहराध्यक्ष म्हणून काम करत असताना विकास गोसावी यांनी भाजपचे मूळ प्रवाहातील कार्यकर्ते आणि नव्याने येणार्‍या कार्यकर्त्यांची चांगली सांगड घातली होती. लोकसभा, विधानसभा निवडणुकांसोबतच सभासद नोंदणीच्या कार्यातही त्यांनी चांगले योगदान दिलेले आहे. त्यामुळे हे पाचही पदाधिकारी जिल्हाध्यक्षपदासाठी दावेदार ठरले आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर मंत्रिपद वाटपाचा कार्यक्रम पार पडताच भाजपने सदस्य नोंदणीचा कार्यक्रम देशभर हाती घेतला होता. सातारा जिल्ह्यातून सदस्य नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळाला. पक्षाने जिल्ह्यामधील मंडलांची संख्याही वाढवलेली आहे. ज्या ठिकाणी एक मंडल होते, तिथे आता दोन मंडलांची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकाच शहरात दोन शहराध्यक्ष पहायला मिळतील. शहराध्यक्षांची निवड पार पडल्यानंतर जिल्हाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष निवडले जातील. जिल्हाध्यक्ष निवडीमध्ये मंत्री, खासदार, आमदार यांची मतेही जाणून घेतली जाणार आहेत. सध्याचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्याकडे पक्षाच्यावतीने कोणती जबाबदारी दिली जाणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news