

महाबळेश्वर : महाबळेश्वरचे वैभव, शहरापासून हाकेच्या अंतरावरील सूर्योदय, सूर्यास्तासाठी प्रसिद्ध विल्सन पॉईंटवर असलेल्या रस्त्याची प्रचंड दैना झाली आहे. लाखो पर्यटकांसह स्थानिकांची वर्दळ असते. मात्र, गेले काही वर्षे या पॉईंटकडे जाणार्या रस्त्याला खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. या पॉईंटवर मद्यपींचाही उपद्रव वाढला आहे. पथदिवेही बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मात्र, याकडे वन विभाग दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.अल्हाददायक वातावरण, मनमोहक सूर्योदय व सुर्यास्त व मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकसाठी पर्यटकांची नेहमीच रेलचेल असते. परंतु, या पॉईंटकडे जाणार्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. विल्सन पॉईंटकडे गौतम हॉटेलच्या दिशेने जाणारा मुख्य रस्ता उखडला आहे तसेच रस्त्यच्या बाजूला जांभ्या दगडात केलेला फुटपाथही फुटल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. पॉईंटवरून दुसर्या बाजूने खाली येताना फोरॉक्स बंगल्यामागील या रस्त्याची वाट लागली आहे. यामुळे वॉकसाठी जाणारे नागरिक हैराण झाले आहे. रस्ते उखडलेले त्या भरीस भर म्हणून पथदिवेच नसल्याने अंधारातून मार्गक्रमण करावे लागते. यामुळे एखाद्यावर वन्यप्राण्यांचा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेकदा मागणी करूनही पथदिवे बसवले जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
विल्सन पॉईंटवर तळीरामांचा वावर थांबण्याचे नाव घेत नसून बाटल्यांचा खच, सिगारेटची थोटकं, फोडलेल्या बाटल्यांमुळे पॉईंटच्या सौंदर्याला डाग लागत आहे. या मद्यपींचा बंदोबस्त करण्या वन विभाग अपयशी ठरत आहे. अवघ्या काही दिवसांवर पर्यटन महोत्सव येवून ठेपला आहे. यासाठी वन विभाग व पालिकेने समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. रस्त्यांची कामे, पथदिवे बसवणे, परिसराची स्वच्छता आदी कामे प्राधान्याने करण्याची मागणी होत आहे.