

पाचगणी : जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पाचगणी पालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगणार आहे. पालिकेची बराच काळ सत्ता भोगलेल्या नगराध्यक्षा लक्ष्मी कराडकर आपला गड राखणार की मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आपल्या ताकदीच्या जोरावर कराडकरांची सत्तेची ट्रेन रोखणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
पाचगणीच्या राजकारणात आजपर्यंत कुठल्या एका पक्षाला जनतेने थारा दिला नाही. प्रत्येक वेळी अपक्ष लढून नंतर आघाडी करत सत्ता स्थापन करण्याची परंपरा पाचगणीत आहे. गत निवडणुकीत भाजप आणि रिपाइंने युती करत प्रयत्न केले मात्र त्यांना मतदारांनी चार हात लांब ठेवले. हा इतिहास पाहता तीन वेळा नगराध्यक्ष राहिलेल्या लक्ष्मी कर्हाडकर यांना अंतर्गत राजकारणाला सामोरे जावे लागणार आहे. प्रशासक काळात नगरसेवकांनी नगरपालिकेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. त्यामुळे या निवडणुकीला वेगळे महत्व राहणार आहे.
वाई विधानसभा मतदारसंघाचे आ. मकरंद पाटील यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ आहे. तर त्यांचे बंधू नितीनकाका पाटील यांना खासदारकी मिळाल्याने लक्ष्मी कर्हाडकर विरूध्द पाटील बंधू अशी तगडी फाईट राहणार आहे. महाबळेश्वर तालुक्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले असले तरी आतापर्यंत आघाड्या करूनच सत्तास्थाने ताब्यात ठेवावी लागली. मात्र, यंदा महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही पालिका राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली ना. मकरंद पाटील यांचा प्रयत्न राहिल. त्यासाठी त्यांची रणनीती काय असेल? कर्हाडकर आपली प्रतिष्ठापणाला लावून पाटील बंधूना कसे रोखतील आणि पाचगणीकर एका पक्षाला किती स्वीकारतील? या प्रश्नांची उत्तरे निवडणुकीतच मिळणार आहेत.
पाचगणी नगरपालिकेत 2021 पासून प्रशासकराज असल्याने शहरातील अनेक विकासकामांना खीळ बसली आहे. कामे होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. नागरिकांना समस्या येत असताना कुठलाही आजी माजी नगरसेवक जनतेच्या कामांसाठी बाहेर न पडल्याने यावेळी ही निवडणूक सद्य स्थितीला उमेदवारांना नशीब आजमावणारी ठरणार आहे. नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये जुने जाणते मातब्बर यावेळी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. परंतु राजकीय आखाड्यात आरक्षणाच्या कचाट्यात सापडतात की काय? हे पाहावे लागेल.
पाचगणी पालिकेत 2019 च्या निवडणुकीत भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस अशी लढत झाली होती. पण आता चित्र वेगळे आहे. राज्यात राष्ट्रवादी, भाजप व शिंदे शिवसेना एकत्र आहेत. राज्यस्तरावर महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याचा नारा देण्यात आला आहे. मात्र, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचे सूत कसे जुळेल? तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाचगणीतून अनेक कार्यकर्ते आबांच्या विरोधात एकवटले होते. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली जुनी स्पर्धा आणि मतभेद लक्षात घेतल्यास मतभिन्नता आणि गटबाजी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.