

सातारा : भारतीय जनता पार्टीच्या शिखर नेतृत्वाचा आदेश माझ्यासाठी प्रमाण आहे. पक्षाने उद्या सांगितले की आपल्याला बॉण्ड्रीवर जाऊन उभे राहायचे तर देशाच्या बॉण्ड्रीवर जाऊन उभे राहू. त्या पद्धतीनेच मला जिल्हाध्यक्ष होण्याचा पक्षाकडून आदेश आला. आमदार म्हणून एका मतदारसंघापुरता मी मर्यादित विचार करत होतो. मात्र आता जिल्हाध्यक्षपद देऊन पक्षाने माझे प्रमोशन केले आहे, अशी भावना भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
आ. डॉ. अतुल भोसले म्हणाले, जिल्हावासियांच्या स्वागताने मी भारावून गेलो आहे. जिल्ह्यामध्ये भाजप हा सगळ्यात मजबूत पक्ष ठरला आहे. जिल्ह्यातील चार मतदारसंघांमध्ये भाजपने पकड मिळवली आहे. आता जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षसंघटना आणखी मजबूत करण्याचे काम मी हाती घेणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. माझ्या आधीच्या जिल्हाध्यक्षांनीही चांगले काम केले असल्याने मला पुढील वाटचाल सोपी झाली आहे.
केंद्र व राज्यामध्ये महायुतीचे सरकार असल्याने अधिक वेगाने विकासकामे केली जातील. काम करत असताना जुन्या नेत्यांनाही विश्वासात घेतले जाईल. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केले. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्याने पुढील विधानसभा निवडणुकांमध्येही आपला विजय सोपा झाला होता. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही चांगले काम करायचे आहे. अनेक इच्छूक मला भेटत आहेत. मला जे काही मिळाले आहे, त्याचे सगळे श्रेय हे पक्षाचे आहे.
मी जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छूक नव्हतो, तरी देखील पक्षाने माझ्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे. जिल्ह्यामध्ये माझे व्यक्ती म्हणून नाही तर भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून स्वागत झाले. स्वागत मोठं झालं असलं तरी पक्ष मोठा व मजबूत झाला आहे. मला आता आमदार म्हणून जनतेने संधी दिली आहे. भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. शिवेंद्रराजे भोसले आणि खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व ना. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. याप्रसंगी ना. शिवेंद्रराजे भोसले, आ. मनोजदादा घोरपडे, नरेंद्र पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, डॉ. दिलीप येळगावकर, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सुनील काटकर आदींची उपस्थिती होती.