Shekhar Gore| कोणत्याही परिस्थितीत जिल्हा बँकेत संचालक म्हणून जाणार

शेखरभाऊ गोरे : जिल्हा बँक निवडणूक ताकदीने लढवण्याचा निर्धार
Shekhar Gore
Shekhar Gore
Published on
Updated on

म्हसवड :सातारा जिल्हा बँकेत आपण गेल्या निवडणुकीत सर्वच विरोधकांना चपराक देत मोठा राजकीय संघर्ष करत माण सोसायटी मतदारसंघातून संचालक म्हणून निवडून आलो होतो. सध्या जि. बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास सेवा सोसायट्यांचे ठराव चालू आहेत. या ठरावाबाबत काहीजण काहीही वल्गना करत गुडघ्याला बाशिंग बांधून बसले असले तरी आपण ठरावांचे सर्व गणिते सोडवत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जिल्हा बँकेत संचालक म्हणून आपणच जाणार असल्याचा विश्वास सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखरभाऊ गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

शेखरभाऊ गोरे म्हणाले, गेल्या जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ झाली होती. सर्वच विरोधक नेतेमंडळींनी एकत्र येत फक्त शेखर गोरेला संचालक होऊ द्यायचे नाही, असा अजेंडा घेतला होता. आपल्याला थांबवण्यासाठी सर्व हेवेदावे बाजूला ठेवत राजकीय तह करत आपल्या विरोधी उमेदवारास मदत केली होती. तरीही आपण सर्व विरोधकांना चपराक देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत जिल्हा बँकेत संचालक म्हणून प्रवेश केला. गेल्या पाच वर्षांत जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी, सभासद आणि सहकार क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्नांवर काम करण्याची संधी मिळाली. या संधीमुळे शेतकरी, सभासदांचे विविध प्रश्न सोडवता आले. सध्या जिल्हा बँकेची निवडणूक लांब असली तरी मतदानासाठी लागणारे गावोगावी सोसायट्यांचे ठराव करण्यात येत आहेत. यासाठी काहीजण साम, दाम, दंड, भेद या सर्वांचा वापर करत आहेत. परंतु कोणी कितीही ताकद लावली असली तरी आपली भूमिका आत्तापासूनच स्पष्ट असून, निवडणूक कितीही कठीण असो, राजकीय आव्हाने कितीही असोत; ठरावांचे गणित जुळवत जिल्हा बँकेत पुन्हा संचालक म्हणून जाण्याचा आपला निर्धार कायम असल्याचेही शेखरभाऊ गोरे यांनी सांगितले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीची अधिकृत प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध गटांकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू असून ठरावांचे संख्याबळ मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोणती राजकीय समीकरणे आकार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news