

महाबळेश्वर : आगामी पालिका निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जाणार आहेत. यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. महाराष्ट्रात पुरोगामी विचारांची सांगड सामान्य जनतेशी घालण्यासाठी मी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी दिली.
महाबळेश्वर येथे महाविकास आघाडीच्या वतीने सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी आ. रोहित पवार, माजी जि.प. अध्यक्ष अरुणादेवी पिसाळ, जिल्हाध्यक्ष सुनील माने, ठाकरे गटाचे डी. एम. बावळेकर, राजेेंद्र कुंभारदरे, यशवंत घाडगे, सलीम बागवान, ज्येष्ठ नेते विश्वनाथ संपकाळ, सुनील संकपाळ, बाळासाहेब पवार, सुभाष कारंडे, आशिष चोरग आदी उपस्थित होते.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, पक्षश्रेष्ठींनी दाखवलेला विश्वास आणि सर्वांच्या पाठिंब्यामुळेच ही जबाबदारी मिळाली आहे. ही संधी म्हणजे सेवा करण्याचे दायित्व आहे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी कटिबद्ध आहे. आगामी निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जातील. महाबळेश्वर शहरात लोकसभेला आपल्याला लिड मिळाले होते. यामुळेच महाबळेश्वर व पाचगणी पालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल. शहरातील गल्ली व बोळ मला माहीत आहे म्हणुनच मी या दोन्ही शहरातील निवडणुका जिंकण्याची योजना तयार असून ती मी योग्य वेळी जाहीर करणार आहे, असेही आ. शिंदे म्हणाले. आ. रोहित पवार म्हणाले, मुंबईत सरकारने हिंदु मुस्लीम असा वाद निर्माण केला होता. आता तर मराठी आणि हिंदी वाद सुरू केला आहे. महाविकास आघाडीने सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेवून कारभार करत आहे. हे सरकार एका समाजाला लक्ष करत आहे, असेही ते म्हणाले.