Bhandarkar Institute: भांडारकर संस्था माफी मागणार का?

राजधानी साताऱ्यातील शिवप्रेमी आक्रमक; राज्यभरातून होणार उठाव
Bhandarkar Institute
Bhandarkar Institute: भांडारकर संस्था माफी मागणार का?Pudhari
Published on
Updated on

सातारा : जेम्स लेनच्या ‌‘शिवाजी - हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया‌’ या पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी या पुस्तकाचे प्रकाशक असलेल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने छत्रपती शिवरायांचे 13 वे वंशज खा. उदयनराजे भोसले व महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितल्यानंतर आता राजधानी साताऱ्यासह राज्यभरातील इतिहासप्रेमींकडून पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेनेही जाहीर माफी मागावी, अशी भावना व्यक्त होत आहे. याबाबत शिवप्रेमी आक्रमक झाले असून, राज्यातून उठाव होण्याची चिन्हे आहेत.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडिया, प्रकाशित, जेम्स लेनच्या ‌‘शिवाजी - हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया‌’ या पुस्तकात युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि माँसाहेब जिजाऊ यांची प्रतिमा मलीन करणारा मजकूर लिहिला होता. त्याविरोधात खा. उदयनराजे भोसले यांच्या वतीने मुख्य न्यायदंडाधिकारी, सातारा यांच्या न्यायालयात 2004 मध्ये खासगी फौजदारी खटला दाखल केला होता. हा फौजदारी खटला चालवू नये, काढून टाकावा, याकरिता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाचे संपादक सय्यद मंझर खान, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथील संस्कृतचे प्राध्यापक डॉ. श्रीकांत बहुलकर, प्राध्यापिका सुश्री सुचेता परांजपे, भांडारकर संस्थेचे ग्रंथपाल व्ही. एल. मंजूळ यांच्या वतीने उच्च न्यायालयात दंडविषयक रिट याचिका दाखल केली होती. ही रिट याचिका आणि दंडविषयक अर्ज न्यायालयात प्रलंबित होता.

संबंधित याचिकेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्या. शिवकुमार सी. दिघे यांच्यासमोर 17 डिसेंबर 2025 रोजी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान मूळ आरोपी आणि याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी खा. उदयनराजे भोसले यांची माफी मागायची तयारी दर्शवली आणि त्या लेखी माफीनामा पत्राची मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रांत राष्ट्रीय पातळीवर व्यापक प्रसिद्धी दिली जाईल, असे कथन केले. खा. उदयनराजे भोसले यांच्या वतीने ॲड. शैलेश चव्हाण, ॲड. रणजित पाटील, ॲड. धवलसिंह पाटील यांनी कोर्टाने तसे आदेश द्यावेत, असे सांगितले. त्यावर न्यायमूर्ती दिघेे यांनी राष्ट्रीय पातळीवरील सर्वात जास्त खपाच्या वृत्तपत्रात माफीनामा पत्र प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून जाहीर माफी मागण्यात आली. याबाबतचा माफीनामा उच्च न्यायालयातही सादर करण्यात आला.

‌‘शिवाजी - हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया‌’ या पुस्तकात पान क्रमांक 31, 33, 34 आणि 93 वर काही आक्षेपार्ह विधाने प्रसिद्ध करण्यात आली होती. या विधानांची पडताळणी न करता प्रसिद्ध केली, असे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने जाहीर निवेदनात मान्य केले. पुस्तकातील उल्लेखांची पडताळणी केली गेली नाही. त्या चुकीबद्दल आम्हाला मनापासून वाईट वाटत आहे. या गोष्टीची जाणीव आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे लाखो लोकांच्या हृदयात सन्मानाचे आणि अगाध स्थान आहे. मी त्यांच्या वारशाशी निगडित तीव्र सार्वजनिक भावनांचा आदर करतो. सामान्य जनतेला झालेल्या दु:खाबद्दल आम्ही मनापासून खेद व्यक्त करतो. खा. उदयनराजे भोसले यांना झालेल्या त्रासाबद्दल व वेदनेबद्दल बिनशर्त माफी मागत असल्याचे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

या प्रकारानंतर आता राजधानी साताऱ्यासह राज्यभरातील इतिहासप्रेमी व शिवप्रेमींनी पुण्यातील भांडारकर संस्थेने जाहीर माफी मागावी, अशी जोरदार मागणी केली आहे. जेम्स लेन नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला भारतात आला होता. ‌‘महाभारत‌’चा अभ्यास करण्यासाठी आल्याचे त्याने म्हटले होते. पुण्यातील भांडारकर संशोधन संस्थेत त्याने आपल्या अभ्यासाला सुरुवात केली, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जनमानसात असलेला प्रभाव त्याला जाणवायला लागला. त्यानंतर त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पुस्तक लिहायचे ठरवले. या पुस्तकासाठी जेम्स लेनला भांडारकर संस्थेने मदत केली होती. त्यामुळे या पुस्तकाबद्दल भांडारकर संस्थेला अनेक संघटनांनी आणि इतिहासकारांनी जबाबदार धरले. त्यातूनच भांडारकर संस्थेतील प्रा. बहुलकर यांना शिवसेनेने काळे फासले होते. राज्यभरातून भांडारकर संस्थेच्या विरोधात संतापाची लाट उसळली. संभाजी ब्र्रिगेडने भांडारकर संस्थेवर हल्ला करून तोडफोडही केली होती.

आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने माफी मागत उच्च न्यायालयात माफीनामा सादर केला. त्यामुळे भांडारकर संस्था याप्रकरणी माफी मागणार का? या विषयालाही तोंड फुटले आहे. राज्यभरातील शिवप्रेमींची भावना लक्षात घेऊन भांडारकर संस्थेने माफी मागावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news