

कराड : शहरात अनेक खासगी, सहकारी व शासकीय बँकांच्या शाखा आहेत. तसेच या बँकांची एटीएम केंद्रही आहेत. मात्र, सध्या या एटीएम केंद्रांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसते. वारंवार घडणार्या चोरीच्या घटनांमधून एटीएमच्या सुरक्षेबाबत आर्थिक संस्थांचा असलेला निष्काळजीपणा चव्हाट्यावर येत आहे.
कराडात ग्राहकांच्या सोयीसाठी विविध बँकांनी ठिकठीकाणी एटीएम सेंटर सुरू केली आहेत़ शहरासह उपनगरात एटीएमच्या माध्यमातून ग्राहकांना सुविधा देण्यात येतात. एखाद्या एटीएम मशिनला तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास काही वेळातच बँकेच्या कर्मचार्यांकडून त्याची दुरूस्ती केली जाते़ वारंवार एटीएम मशिनमध्ये पैशाचा भरणाही केला जातो़ पैशाचा भरणा व मशिनची दुरूस्ती करताना काहीवेळ एटीएम सेंटर बंद ठेवण्यात येते. सुरक्षेच्या द़ृष्टीने केली जाणारी ही तात्पुरती उपाययोजना आहे़ मात्र, कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत काही बँका निरूत्साही आहेत़ एटीएम मशिन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न शहरासह परिसरात यापूर्वी अनेकवेळा झाला आहे़ गजानन हौसिंग सोसायटी परिसर व विमानतळ-मुंढे येथे अशी घटना घडली आहे. मात्र, तरीही एटीएमच्या सुरक्षेबाबत आर्थिक संस्था गंभीर नाहीत.
1) चोवीस तास वॉचमन असावा.
2) सीसीटीव्ही यंत्रणा असावी.
3) सीसीटीव्हीमध्ये बिघाड झाल्यास दुरूस्ती करावी.
4) काचांना गडद फिल्मींग नसावे.
5) एटीएम सेंटरची समोरची बाजू पारदर्शी असावी.
6) बँकेच्या जाहिराती एटीएमच्या काचांवर असू नयेत.
7) एटीएमच्या आत व बाहेर लाईटची सोय असावी.
8) दरवाजाला ‘कार्ड स्वाईप’ची प्रणाली असावी.
एटीएम सेंटरमध्ये सीसीटीव्ही असतात. मात्र, कजहाडात काही सेंटरवरील सीसीटीव्ही कॅमेर्यांचीही दुरवस्था झाल्याचे दिसून येते. ठिकठीकाणी मोडतोड होऊन कॅमेरे लोंबकळत असल्याचे दिसते. तर काही ठिकाणी कॅमेर्यांवर धूळ साचल्याचे पहायला मिळते.