

सातारा : पुढारी वृत्तसेवा
बाप्पांच्या आगमनाने अवघे जनजीवन बाप्पामय झाले आहे. यावर्षीच्या उत्सवामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांनी थीम सजावटीला प्राधान्य दिल्याने कुठे पौराणिक मंदिरे, तर कुठे ऐतिहासिक महल साकारण्यात आले आहेत. उत्सवामध्ये सार्वजनिक गणेशमूर्तींची भव्यता, सजावटीची कलाकुशलता गणेशभक्तांचे आकर्षण ठरत आहे.
जिल्ह्यासह सातारा शहरातील सार्वजनिक गणेश उत्सवाला मोठी परंपरा लाभली असून, भक्तिभावाने हा वारसा जोपासला जात आहे. याच भक्तिभावाने सार्वजनिक मंडळांचे गणपती बाप्पा मंडपामध्ये विसावले आहेत. 10 दिवसांच्या वास्तव्यासाठी मंडप सजवताना विविध प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. यामध्ये पौराणिक मंदिरे, प्रसिद्ध वास्तू, ऐतिहासिक महलांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. शनिवार पेठेतील लोकमान्य बाल गणेश मंडळाने ऐतिहासिक राजमहल, पाचशे एक पाटीजवळील जयहिंद गणेश मंडळाने सूर्यमंदिराचा सेट उभारला असून, मंडपाच्या वरील बाजूला तामिळनाडू येथील कोईमतूर योगी भगवान शंकराची भव्य मूर्ती साकारली आहे. शेटे चौकातील प्रकाश मंडळाने पौराणिक शिवमंदिर साकारून त्यामध्ये शंकर-पार्वती रूपातील गणेशमूर्ती विराजमान केली आहे. पंताचा गोट
येथील हनुमान गणेश मंडळाची ऐतिहासिक प्रतिकृती, मोती चौकातील श्री. छ. प्रतापसिंह महाराज गणेश मंडळ व सम्राट गणेश मंडळ यांचे भव्य उंचीचे मंडप अन् मूर्ती, पंचमुखी गणेश मंदिर ट्रस्टची शेंदूरातील गणेशमूर्ती लक्षवेधक ठरल्या. काही मूर्तींची भव्यता, तर काही मूर्तींचे सोन्या-चांदीचे दागिने यांचे अप्रुप गणेश भक्तांना वाटत आहे.
बाप्पांच्या उत्सवात दरवर्षी मोती, हिरे, विविध रंगांतील काचा, चॉकलेट, बिस्किटे, शिंपले, मणी, तुरटी, कागदाचे कोलाज यापासून विविध रूपातील गणेशमूर्ती साकारण्यात येतात. या पार्श्वभूमीवर सातारा शहरात चक्क चॉकलेटपासून बाप्पांची सुंदर मूर्ती साकारण्यात आली आहे. सोमवार पेठेतील विश्वविजय गणेश मंडळात 7 हजार छोट्या कॅडबरी चॉकलेटपासून बालगणेशाची मूर्ती साकारण्यात आली आहे. या गणेशमूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीत सर्व बालकांना या कॅडबरी प्रसाद रूपात भेट दिल्या जाणार आहेत.