Satara Rain: पश्चिमेकडे संततधार; दरडी कोसळल्या

दोन दिवस रेड अलर्ट : महाबळेश्वरमध्ये २४ तासांत साडेसात इंच पाऊस
Satara Rain: पश्चिमेकडे संततधार; दरडी कोसळल्या
Published on
Updated on

सातारा/महाबळेश्वर : जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून शुक्रवारी दिवसभर संततधार पाऊस कोसळला. सरीवर सरी पडल्यामुळे जनजीवन चिंब भिजून गेले. या पावसाने खंबाटकी व पसरणी घाटात दरडी कोसळण्याचे प्रकार घडले. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. महाबळेश्वर शहर व परिसरात गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने हजेरी लावत १८६.८ मि.मी. पावसाची नोंद झाली.

सातारा, जावली, महाबळेश्वर, वाई, कराड, पाटण तालुक्यांतील घाटमाथ्यावर पावसाची संततधार कायम आहे. जिल्ह्यातही पुढील दोन दिवस घाट क्षेत्रात रेड अलर्ट दिला आहे. महाबळेश्वर शहर व परिसरात गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने हजेरी लावत १८६.८ मि.मी. (७.३५ इंच) पावसाची नोंद झाली आहे. या दमदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शहरातील मुख्य बाजारपेठेत शुकशुकाटाचे वातावरण पाहायला मिळाले. पावसामुळे मांघर गावानजीक संरक्षक भिंत कोसळली.

हवामान विभागाच्या नोंदीनुसार, गुरुवारी सकाळी ८.३० ते शुक्रवारी सकाळी ८.३० या २४ तासांच्या कालावधीत १८६.८ मि.मी. (७.३५ इंच) पावसाची नोंद झाली. तर १ जून ते ३ जुलैअखेर एकूण ७४०.२ मि.मी. (२९.१४ इंच) पाऊस झाला आहे. सध्याचा पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत वेण्णा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, महाबळेश्वर तालुक्यातील मांघर गावाजवळील घोडे पारुट बसथांब्याजवळ एप्रिल महिन्यात नव्याने बांधण्यात आलेली संरक्षक भिंत मुसळधार पावसामुळे कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

शुक्रवारी सायंकाळी ५ पर्यंतच्या २४ तासात पावसाची झालेली नोंद अशी, सातारा १४.९, जावली ५०.४, पाटण २८.१, कराड ७.८, कोरेगाव ८.८, खटाव २.२, माण ०.७, फलटण २.२, खंडाळा ८.८, वाई ३६.५, महाबळेश्वर १८६ मिली मीटर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news