

कराड : बालकांचे आरोग्य सुधारावे यासाठी अंगणवाड्यांना सरकारी योजनांमधून वॉटर फिल्टर दिले गेले, पण अनेक अंगणवाड्यांना ग्रामपंचायतींकडून नळ कनेक्शनच दिली गेली नाहीत. काही ठिकाणी वीज कनेक्शन नाही. त्यामुळे पन्नास टक्के अंगणवाड्यांमध्ये वॉटर फिल्टर धूळ खात पडून आहेत. कराड तालुक्यात पन्नास टक्के अंगणवाड्यांमध्ये वॉटर फिल्टर वापरात नाहीत. लाईट नाही, पाणी नाही, जे बसविले ते बंद पडले, अशी भयानक परिस्थिती आहे. सातारा जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात हेच विदारक चित्र आहे.
दरम्यान, ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे, त्या ठिकाणच्या पाण्याच्या गुणवत्ते नुसार वॉटर फिल्टर देणे अपेक्षित होते, पण याचाही विचार न करता आणि पाण्याची गुणवत्ता न तपासताच वॉटर फिल्टर बसवले गेल्याचे समोर आले आहे. कराड तालुक्यात दक्षिण व उत्तरमध्ये सहाशेहून अधिक अंगणवाड्या आहेत. अंगणवाड्यांना काही दिवसांपूर्वी वॉटर फिल्टर देण्यात आले आहेत, पण गावपातळीवर अंगणवाड्यांची कसलीही माहिती न घेता व तेथील पाण्याची गुणवत्ता न तपासताच वॉटर फिल्टर बसविले गेले आहेत.
जवळपास पन्नास टक्के अंगणवाड्यांना स्वतःची नळ कनेक्शन नाहीत. अंगणवाड्यांनी मागणी करूनही संबंधित ग्रामपंचायतींनी नळ कनेक्शन दिलेली नाहीत. काही अंगणवाड्यांना वीज कनेक्शन नाही. पाणी नाही, वीज नाही मग वॉटर फिल्टरचा उपयोग काय? त्यामुळे सरकारी योजनेतून अंगणवाड्यांना वॉटर फिल्टर देण्याच्या हेतूबद्दलच शंका उपस्थित झाल्या आहेत. अनेक अंगणवाड्यांमध्ये वॉटर फिल्टर बसविलेली दिसतात प्रत्यक्ष ती कार्यान्वीत नाहीत. ती केवळ शोपीस बनून राहिली आहेत.
खरे तर वॉटर फिल्टर खरेदी करण्यापूर्वी गाव पातळीवरील पाण्याच्या गुणवत्तेनुसार वॉटर फिल्टरची निवड आवश्यक असते. आरओ प्युरिफायर फिल्टर, यूव्ही प्युरिफायर, यूएफ प्युरिफायर असे साधारण फिल्टरचे प्रकार आहेत. त्या परिसरातील पाण्याच्या गुणवत्तेनुसार वॉटर फिल्टरची निवड आवश्यक असते. कारण काही गावात नदीचे, काही गावात बोअरचे तर काही गावात विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. पण याचा कसलाही अभ्यास न करता अंगणवाड्यांमध्ये वॉटर फिल्टर बसविले गेले आहेत. यातून बालकांना शुध्द पाणी देण्याचा शासनाचा हेतू शंभर टक्के साध्य झाला नाहीच. पण कोणाचे उखळ पांढरे झाले हे वेगळे सांगण्याची गरज नाही. वॉटर फिल्टर प्रकरणाची चौकशी झाल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येतील.