

सातारा : उन्हाच्या तडाख्यामुळे सातारा शहरातील पाणी वितरण व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. त्यामुळे बुधवार दि. 7 रोजीपासून कास योजनेतून पाणीपुरवठा होणार्या शहराच्या पश्चिम भागात एक दिवसाची पाणी कपात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रशासनाने सात झोन तयार केले असून या भागातील पेठांमध्ये रोटेशनपद्धतीने पाणी कपात होणार आहे. त्यामुळे सातारकरांनी पाण्याचा संतुलित वापर करण्याचे आवाहन सातारा पालिका प्रशासनाने केले आहे.
उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे शहरात पाण्याची प्रचंड मागणी वाढली आहे. सांबरवाडी जलशुद्धीकरण प्रकल्पातून होणार्या पाणीपुरवठ्यावर ताण पडत आहे. पाणी वितरण व्यवस्थेची सध्याची क्षमता अपुरी पडत आहे. त्यातच व्यंकटपुरा पेठ, रामचा गोट तसेच चिमणपुरा पेठ आणि मेहंदळे आळी परिसरास एकवेळचा पाणीपुरवठा करणारा महादरे तलाव आटला आहे. त्यामुळे या भागास कास पाणीपुरवठा योजनेतून अतिरिक्त पाणी द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेने बुधवारपासून पश्चिम सातार्यातील काही भागांमध्ये झोननिहाय एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
भैरोबा टाकीतून पाणीपुरवठा होत असलेल्या शुक्रवार पेठ आणि गडकर आळी परिसरास सोमवारी पाणीपुरवठा केला जाणार नाही. तसेच मंगळवारी बोगदा परिसर, पॉवर हाऊस परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याच दिवशी व्यंकटपुरा टाकीतून व्यंकटपुरा पेठ, धननीची बाग, करंडबी नाका परिसर, मंगळवार तळे, कोल्हटकर आळी, नागाचा पार या परिसरास पाणीपुरवठा केला जाणार नाही.
बुधवारी कात्रेवाडा टाकीतून पाणीपुरवठा केल्या जाणार्या मनामती चौक, गुजर आळी, चिमणपुरा पेठ, ढोणे कॉलनी या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.गुरूवारी कात्रेवाडा घंटेवारीतील संध्याकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत पाणीपुरवठा होणार्या भटजी महाराज मठ परिसर, रामाचा गोट, गवंडी आळी, मंगळवार तळे, कोल्हटकर आळी, नागाचा पार या परिसरास पाणीपुरवठा होणार नाही. तसेच मेन लाईन (निळी) गोल टाकी (दुसरा झोन) सकाळी 7 ते सकाळी 8 यावेळी पाणीपुरवठा होणार्या पद्मावती मंदिर परिसर, होलार समाज मंदिर परिसर, मंगळवार पेठ, ठक्कर कॉलनी, बोगदा ते समर्थ मंदिर परिसर, धस कॉलनी परिसर, दस्तगीर नगर परिसरात पाणीकपात केली जाणार आहे.
मेन लाईन (निळी) गोल टाकी (दुसरा झोन) सकाळी 6 ते 7 यावेळेत पाणीपुरवठा होणार्या कबीर सोसायटी व पोळवस्ती, पापाभाई पत्रेवाला चाळ, चिमणपुरा पेठ, गारेचा गणपती, मनामती चौक, नागाचा पार परिसर तसेच संत कबीर सोसायटी व पोळवस्ती (निळी लाईन) दुपार सत्रात होणारा संत कबीर सोसायटी व पोळवस्तीत निळी लाईनवरून होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे.
कोटेश्वर टाकीतून पाणीपुरवठा केल्या जाणार्या शुक्रवार पेठ, प्रतापगंज पेठ, बुधवार नाका, नामदेववाडी झोपडपट्टी या परिसरात शनिवारी पाणीकपात केली जाणार आहे. खापरी लाईन बंद, 4 नंबर टाकीची 3 इंची लाईन बंद व गुजर आळी तसेच गुरूकुल टाकीतून पाणीपुरवठा केल्या जाणार्या बोगदा परिसर, खापरी लाईन 4 नंबर टाकीवरून वितरित करण्यात येणारे बोगदा ते बालाजी अपार्टमेंट परिसर व कांबळे वस्ती, जांभळे वाडा परिसर लाईन, जंगी वाडा परिसर, गोल मारूती परिसर ते राजवाडा लाईन या परिसरास रविवारी पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.
कास धरणात पुरेसा पाणीसाठा असला तरी धरणातून शहराकडे येणार्या जलवाहिन्यांची क्षमता कमी आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्याचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यास मर्यादा येत आहेत. या जलवाहिन्यांची क्षमता वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम वर्षभरात पूर्ण होईल, असा अंदाज आहे.उन्हाळा असेपर्यंत ही पाणी कपात सुरू राहू शकते. पाणी वितरण व्यवस्थेतील असमातोल हाताळण्यासाठी पाणी कपातीचा अपरिहार्य निर्णय तातडीने घेण्यात आला असून नागरिकांनी सहकार्य करावे. पाण्याचा जपून वापर करावा. पाण्याची नासाडी करू नये, असे आवाहन नगरपालिका प्रशासनाने केले आहे.