Banawadi news: स्वच्छ -सुंदर बनवडीत सांडपाणी रस्त्यावर

नागरिकांचे आरोग्य धोक्यात ; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आणखी किती दिवस?
Banawadi news
Banawadi news: स्वच्छ -सुंदर बनवडीत सांडपाणी रस्त्यावरPudhari
Published on
Updated on

कराड : स्वच्छतेबाबत राज्यस्तरावर गौरव मिळवलेल्या बनवडी ता. कराड येथे सांडपाण्याची समस्या गंभीर बनल्याचे चित्र समोर आले आहे. बनवडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत गृहनिर्माण सोसायट्यांचे सांडपाणी थेट सार्वजनिक रस्त्यावर सोडले जात असल्याने परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी पसरली आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

बनवडी प्रवेशव्दारे ते बनवडी ग्रामपंचायत हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याचे अगोदरच वाटोळे झाले आहे. खड्डेमय रस्त्यामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. शाळकरी मुले,महिला,नोकरदार, वयोवृध्द या सर्वांसाठी हा मुख्य रस्ता आहे. पण हाच रस्ता सर्वांसाठी त्रासदायक ठरू लागला आहे. हे कमी की काय म्हणून आता मुख्य रस्त्यावर गृहनिर्माण सोयायट्यांचे सांडपाणी सोडले गेले आहे. मुख्य रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे पादचारी व वाहनचालकांना अडथळे निर्माण होत आहेत. रस्त्याच्या कडेला साचलेले पाणी डासांच्या उत्पत्तीला पोषक ठरत असून डेंग्यू, मलेरिया आदी आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. शिवाय सांडपाण्यामुळे त्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शालेय विद्यार्थ्यांना व ज्येष्ठ नागरिकांना याचा विशेष त्रास होत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमांनुसार सांडपाण्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावणे बंधनकारक आहे. वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायतीकडून ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे प्रशासनाची कार्यपद्धती व देखरेख यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पुरस्कार प्राप्त बनवडीची वाताहत

स्वच्छता, गांडुळ खत, सांडपाणी व्यवस्थापण, चोवीस बाय सात पाणी योजना, माझी वसुंधरा आदी महत्वपूर्ण कामे मार्गी लावून बनवडी ग्रामपंचायत शासनाच्या अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरली होती. पण आता परिस्थिती बदलली असून माझी वसुंधरासह काही स्पर्धांमधून ग्रामपंचायत बाहेर पडली आहे. स्वच्छतेचा पुरस्कार मिळवणे आणि तो टिकवणे यातला फरक प्रशासनाने ओळखण्याची वेळ आल्याचे मत व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news