

सातारा : सुरूर ते पोलादपूर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मात्र, या कामात ठेकेदाराने मनमानी करत जुन्या व देशी झाडांवर कुर्हाड चालवली आहे. याबाबत दै. ‘पुढारी’ने आवाज उठवल्यानंतर महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाला खडबडून जाग आली आहे.
रस्ते विकास महामंडळाच्या मुख्य अभियंत्यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून रस्ते ठेकेदार असलेल्या टीपीएफ प्रोजेक्ट या कंपनीला नोटीस काढली आहे. रस्त्यासाठी केलेली वृक्षतोड, झाडे वाचवण्यासाठी केलेल्या उपाययोजना याबातचा अहवाल 7 दिवसात मागवला आहे. यामुळे ‘पुढारी’ने उभारलेल्या लढ्याला यश मिळाले आहे.
सुरूर-पोलादपूर रस्त्याच्या भानगडींबाबत सर्वसामान्य जनतेच्या तक्रारींची दखल घेत ‘पुढारी’ने मोहीम उघडली आहे. सध्या सुरूर, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, प्रतापगड ते पोलादपूर या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या रस्ते कामात आवश्यक भासल्यासच झाडे तोडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, संबंधित ठेकेदाराने मनमानी करत सर्रास सर्वच झाडे तोडण्याचा सपाटा सुरू केला आहे. यामुळे हा रस्ता बोडका झाला असून पर्यावरणप्रेमी याविरोधात आक्रमक झाले आहेत. या रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे नागरिकांना आता त्रास सहन करावा लागत आहे.
दै. ‘पुढारी’ने सातत्याने आवाज उठवल्याने याची दखल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महांमडळाच्या मुख्य अभियंत्यांनी घेतले आहे. स्थानिक प्रशासन व पर्यावरणप्रेमींच्या संघटनांना न जुमानता मनमानी करणार्या ठेकेदार असलेल्या टीपीएफ कंपनीला जोरदार चपराक बसली आहे.
याबाबत मुख्य अभियंत्यांनी काही मुद्दे उपस्थित करत खुलासा मागितला आहे. यामध्ये जी 76 झाडे तोडण्यात आली आहेत त्या झाडांच्या लगतची माती मोकळी झाली होती का? ही झाडे खरच धोकादायक होती का? झाडांची मुळे सुरक्षित राहणे व झाडे जिवंत राहण्यासाठी तुम्ही काय केले? रस्ते कामात झाडे कोसळू नये, यासाठी तुम्ही त्याला कोणता आधार देण्यासाठी संरचना तयार केली का? जेवढी झाडे लावली त्याबदल्यात किती व कुठे झाडे लावली? झाडे तोडताना पर्यावरण तज्ञांची मते विचारात घेतली का तसेच झाडे तोडत असताना त्यांनी सांगितलेल्या गोष्टी विचारात घेतल्या का? या मुद्यांचा समावेश आहे.
राज्य पायाभूत विकास महामंडळानेच या प्रकरणात आता लक्ष घातल्याने ‘पुढारी’ने सुरू केलेल्या मोहिमेला हे पहिले यश मिळाले आहे. जर सुरूरपर्यंतच इतक्या झाडांची कत्तल होत असेल तर आणखी पसरणी, महाबळेश्वर, प्रतापगड, पोलादपूर या परिसरात मोठमोठी झाडे आहे. रस्ते महामंडळाच्या या भूमिकेमुळे येथील झाडांची तरी कत्तल होणार नाही. तसेच मनमानी करणार्या ठेकेदारावर कारवाई होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबतचा मेल ठेकेदार कंपनीला पाठवण्यात आला आहे. उपस्थित केलेल्या मुद्द्यावर 7 दिवसांत छायाचित्रांच्या पुराव्यासह याचा अहवाल मुख्य अभियंत्यांनी मागितला आहे. यामुळे आता ठेकेदाराची पाचावर धारण बसली आहे. ठेकेदाराने मनमानी करत ही वृक्षतोड केली आहे. त्यामुळे ठेकेदाराकडून काय अहवाल पाठवला जातो? यावर पायाभूत विकास महामंडळ काय अॅक्शन घेणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे.