

वेलंग : वाई-पाचगणी-महाबळेश्वर या पर्यटनदृष्ट्या अतिशय महत्वाच्या मार्गावरील वाई-सुरूर रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. काम कासवगतीने सुरू असल्याने प्रवासी व पर्यटकांचे हाल होत आहे. रस्ता रूंदीकरण करताना टप्प्या टप्प्याने रस्ता खोदणे आवश्यक असताना सरसकट सर्वत्र खोदाखोदी केल्याने वाहनांची गती कमी झाली आहे. त्यातच पावसाने सर्वत्र खड्डे पडल्याने प्रवाशांचा वेळ वाया जात आहे.
सुरूर ते पोलादपूर या रस्त्याचे रूंदीकरण केले जात आहे. त्यातील वाई ते सुरूर रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्यासाठी सुमारे 292 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्यासाठी ठेकेदार कंपनीने मोठया प्रमाणात वृक्षतोड केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात होता. याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाने ठेकेदाराची कानउघडणी केली होती. तसेच काम गतीने करण्याच्या सूचना केल्या होत्या. याबाबत व्यापारी व नागरिकांनी ना. मकरंद पाटील यांच्याकडेही तक्रारी केल्या.
मात्र, ठेकेदार कंपनीला याचे काहीही देणेघेणे नसल्याचे चित्र आहे. काम धीम्या गतीने सुरू असल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी हे खड्डे गुडघ्याएवढे खोल आहेत. या मार्गावरून जाणार्या महागड्या वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. पर्यटक त्रासून परत जात असल्यामुळे हॉटेल व्यवसाय, पेट्रोल पंप, रेस्टॉरंट्स यासारख्या उद्योगांवर परिणाम झाला आहे.
वाई-सुरूर रस्त्यालगत अनेक गावांतील स्थानिक नागरिक व व्यवसायिक यांची उपजीविका या मार्गावर अवलंबून आहे. अनेक हॉटेल व्यवसायिकांनी लाखो रुपये गुंतवून हॉटेल्स सुरू केली आहेत. मात्र रस्त्याची ही अवस्था पाहून पर्यटकांची संख्या कमी होत चालली आहे.
या कामावर राज्य पायाभूत विकास महामंडळाची देखरेख राहणार आहे. मात्र, ठेकेदार कंपनीची मुजोरी वाढल्याने महामंडळाच्या सूचनांनाही कोलदांडा दिला जात आहे. मनमानीपणे काम सुरू असल्याने नागरिकांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे ना. मकरंद पाटील यांनी याविषयी मंत्रालयात बैठक बोलावून ठेकेदार कंपनीला योग्य ते आदेश देण्याची गरज निर्माण झाली आहे.
देखभाल दुरूस्तीला महामंडळाचा कोलदांडा
यापूर्वी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. मात्र, आता तोच रस्ता पायाभूत विकास महांमडळाकडे गेल्याने याची देखभाल दुरूस्ती महामंडळालाच करावे लागणार आहे. मात्र, गेल्या काही महिन्यात पावसामुळे ज्या काही दरडी कोसळण्याचे प्रकार व रस्त्यावरील खड्डे पडले याची कोणतीही दुरूस्ती महामंडळाच्या ठेकेदाराने केलेली नाही. सध्याच्या ठेकेदाराकडून याला सरळ सरळ नकार दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.