

वाई : एआयच्या जमान्यात जुन्याच नोकर्यांवर लक्ष देताना रोजगार संधींसाठी नवीन वाटा चोखाळणे आवश्यक आहे. आधुनिकतेच्या युगात व भविष्याचा विचार करून विद्यार्थ्यांनी फॉरेन्सिक सायन्स, सायबर सुरक्षा, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि डिजिटल तंत्रज्ञान यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी पहाव्या. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे बहुविषयक शिक्षणाच्या संधी वाढल्या असून भविष्याची वाटचाल पाहून विद्यार्थी व पालकांनी करिअरचे निर्णय घ्यावे, असे आवाहन पुणे येथील नामवंत शिक्षण तज्ञांनी केले.
वाई येथे दै. ‘पुढारी’च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पुढारी कॅम्पस टू करिअर’ या करिअर मार्गदर्शन सेमिनारमध्ये विविध विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन वाईच्या तहसीलदार सोनाली मिटकरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी दिशा अकॅडमीचे संचालक नितीन कदम, दै. ‘पुढारी’चे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, निवासी संपादक हरीश पाटणे, मार्केटिंग मॅनेजर मिलिंद भेडसगावकर, डॉ. राधाकृष्ण बटुळे, रोबोटिक्स मेगा ओपन हाऊसचे शंतनू देशपांडे, मुकेश अग्रवाल, दीपक भोसले, प्रा. प्राजक्ता रामतीर्थ, पल्लवी अहिरे, राहुल जाधव, दीपक भोसले यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
तहसीलदार सोनाली मिटकरी म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना केवळ आर्थिक फायद्याचा विचार न करता आयुष्यभर आनंदाने करता येईल असे क्षेत्र निवडावे. स्वतःच्या शैक्षणिक क्षमता विकसित कराव्या. करिअरसाठी चिकाटी, कठोर परिश्रम आणि योग्य दिशा यशाचे प्रमुख आधारस्तंभ असल्याचे सांगितले.
नितीन कदम म्हणाले, विद्यार्थी आणि पालकांना प्रवेश प्रक्रियेदरम्यान घ्यावयाच्या काळजी घ्यावी. केवळ गुण किंवा अभ्यासक्रम न पाहता महाविद्यालयाची गुणवत्ता, प्लेसमेंट, पायाभूत सुविधा, व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधी आणि कॅम्पस संस्कृती यांचा विचार करूनच प्रवेश घ्यावा. विद्यार्थ्यांनी स्वतःची आवड, क्षमता आणि भविष्यातील करिअरच्या संधी लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
शंतनू देशपांडे म्हणाले, रोबोटिक्स, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्ये विकसित करून भविष्यातील रोजगार बाजारपेठेसाठी स्वतःला सक्षम बनवावे. आधुनिक काळानुसार करिअरच्या नवीन वाटा चोखाळाव्या. ऑटोमेशन, डिजिटल तंज्ञत्रान याकडे करिअरच्या संधी म्हणून पहावे. योग, मानसिक आरोग्यावरही विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले. मुकेश अग्रवाल यांनी अभियांत्रिकी व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. सीईटीच्या विविध फेऱ्या, ऑटो-फ्रीज प्रक्रिया, स्पॉट राऊंड, शिष्यवृत्ती योजना आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती देत योग्य नियोजनाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही योग्य मार्गदर्शन आणि नियोजनाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रा. प्राजक्ता रामतीर्थ म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी पदवीसोबतच मायनर कोर्सेस, परदेशी भाषा, इंटर्नशिप, उद्योग क्षेत्राशी संलग्न प्रकल्प आणि कौशल्यविकास उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. बदलत्या जागतिक स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी बहुआयामी कौशल्ये विकसित करणे आवश्यक आहे. दरम्यान, यावेळी कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, स्टार्टअप संस्कृती, डिजिटल अर्थव्यवस्था आणि उद्योगाभिमुख शिक्षण या विषयांवरही मार्गदर्शन करण्यात आले. भविष्यातील रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी संवाद कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता, क्रिटिकल थिंकिंग, डिजिटल साक्षरता आणि सातत्याने नवीन गोष्टी शिकण्याची वृत्ती आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविकात हरीश पाटणे म्हणाले, देशात नावाजलेल्या वाई शहराला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा वैचारिक वारसा लाभला आहे. विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य करिअर मार्गदर्शन मिळणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी ‘कॅम्पस टू करिअर’सारखे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे. विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी निवडताना अडचणी येवू नये, यासाठीच दै. ‘पुढारी’ने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम, शिष्यवृत्ती, प्लेसमेंट आणि करिअर संधींबाबत माहिती घेतली. ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरल्याचे पालकांनी सांगितले. समीक्षा बोकील यांनी सूत्रसंचलन केले. दीपक भोसले यांनी आभार मानले.