

वाई : पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या महाबळेश्वर व पाचगणीकडे जाणार्या वाईतील पसरणी घाटात मुसळधार पावसामुळे शुक्रवारी दरड कोसळली. घाटातील बुवासाहेब मंदिराजवळ दरड रस्त्यावर आली. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, याची माहिती समजल्यानंतर ही दरड हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे घाटांमध्ये दरडी कोसळण्याचे सत्र सुरू झाले आहे. गेली दोन दिवस आंबेनळी घाटात दरड कोसळली होती. या दरडींचे सत्र शुक्रवारीही सुरूच होते. शुक्रवारी सकाळी पसरणी घाटातील बुवासाहेब मंदिर परिसरात दरड रस्त्यावर कोसळली. सकाळची वेळ व वाहतूक कमी असल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी ही दरड हटवली. घाटात अजूनही पाऊस सुरू असून धुक्याचे साम्राज्य आहे. तसेच डोंगरावरून आणखी दगड खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.