

मुंबई /सातारा : मुंबईतील आयफा स्टील महाकुंभ कार्यक्रमात महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाने नऊ कंपन्यांशी 80 हजार 962 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. या गुंतवणुकीमुळे सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. वाई येथे शंभर कोटी रुपयांची फिल्ट्रम टोकॉम्प कंपनी गुंतवणूक करत असल्यामुळे जिल्ह्यात रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. त्याचबरोबर या करारामुळे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील औद्योगिक विकासालाही गती मिळणार असून स्थानिकांसाठी 40 हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध होतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित स्टील महाकुंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध औद्योगिक कंपन्यांसोबत राज्य सरकारने सामंजस्य करार केले. यातून सातारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, रायगड, छत्रपती संभाजीनगर, आदी जिल्ह्यांत हे प्रकल्प उभारले जाणार आहेत. या गुंतवणुकीमुळे सातारा जिल्ह्यासह विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील औद्योगिक विकासाला गती मिळणार असून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
सातारा जिल्ह्यात वाई येथे फिल्ट्रम टोकॉम्प कंपनी 100 कोटी रूपयांची ऑटोमोटिव्ह स्टील पार्टमध्ये गुंतवणूक करत असून याद्वारे 1200 रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळे वाई परिसरासह सातारा जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. याशिवाय सातारा, चंद्रपूर व नागपूर येथेही स्पंज आयर्न, ऑटोमोटिव्ह स्टील पार्ट्स आणि आयएसपी प्रकल्प उभारले जाणार आहेत. चंद्रपूर येथे आयकॉन स्टील इंडियाकडून 850 कोटीची स्पंज प्रकल्पामध्ये गुंतवणूक केली जाणार असून यातून दीड हजार रोजगार निर्माण होतील.
रायगडमध्ये जिंदाल स्टेनलेस लिमिटेडचा 41 हजार 580 कोटींचा स्टेनलेस स्टील प्लांट बसवला जाणार आहे, ज्यामुळे तब्बल 15 हजार 500 रोजगार निर्माण होतील.
वर्ध्यात रश्मी मेटलर्जिकल इंडस्ट्रीचा 25 हजार कोटींचा एकात्मिक स्टील प्रकल्प येणार असून यामुळे 12 हजार रोजगार मिळणार आहेत.
गडचिरोलीत सुमेध टुल्स आणि हरिओम पाईप इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या संयुक्त प्रकल्पांमुळे सुमारे 5 हजार 500 रोजगार उपलब्ध होणार असून 5,135 कोटींची गुंतवणूक होणार आहे.
छत्रपती संभाजीनगरात एनपीएसपीएल अॅडव्हान्स्ड मटेरियल या कंपनीच्या 5 हजार 440 कोटींच्या गुंतवणुकीतून आधुनिक लिथियम बॅटरी मटेरियल आणि कार्बन कॉम्प्लेक्स उभारला जाणार आहे. यामुळे 5 हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.
मूल येथे जी. आर. कृष्णा फेरो अलॉय ही कंपनी स्पंज निर्मितीसाठी 1 हजार 482 कोटी रुपयांची गुंतवणूक करत असून यातून 500 रोजगार निर्मिती होईल. त्याचबरोबर नागपूर येथे जयदीप स्टीलवर्क इंडिया कंपनी 1 हजार 375 कोटी रुपयांची गुंतवणूक करत असून यातून 600 रोजगार निर्मिती होणार आहे.