

सातारा : देशातील मिनी काश्मीर म्हणजेच महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. वर्षभर येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात. विशेषतः वाई, पाचगणी, महाबळेश्वर आणि पोलादपूर या मार्गांवर पर्यटन हंगामात वाहनांची मोठी गर्दी होत असते. अनेक ठिकाणी अरुंद रस्ते, घाटमाथ्यावरील तीव्र वळणे, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणी यामुळे वाहतूक कोंडीची समस्या वारंवार उद्भवत असल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेली रस्त्यांची कामे लवकरच मार्गी लावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले.
मंत्रालयातील दालनात आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) शरद राजभोज, महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी, मुख्य अभियंता पुणे श्रीमती प्रज्ञा वाळके, उपसचिव शैलेश बोरसे, साताराचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे भरत बाविस्कर व सचिव राष्ट्रीय महामार्ग संतोष शेलार, महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता बैठकीसाठी दुरदृश्यप्रणाली द्वारे उपस्थित होते.
वाई-महाबळेश्वर-पोलादपूर या महत्त्वाच्या पर्यटन मार्गाच्या रुंदीकरण व मजबुतीकरणाच्या कामांचा बैठकीत आढावा घेण्यात आला. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरु असलेल्या वाई, महाबळेश्वर व खंडाळा तालुक्यातील विविध अंतर्गत रस्ते, घाटमार्ग आणि संपर्क रस्त्यांच्या कामांच्या सद्यस्थितीची माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. विशेषतः मांढरदेवी-वाई मार्ग तसेच शिंदेवाडी-भोर या महत्त्वपूर्ण रस्त्यांच्या प्रलंबित कामांबाबत चर्चा करण्यात आली.
वाई-खंडाळा-महाबळेश्वर हा परिसर राज्याच्या पर्यटन नकाशावरील महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित, वेगवान आणि सुकर प्रवास अनुभव मिळावा, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. प्रलंबित रस्ते प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींमध्ये कोणतीही दिरंगाई होऊ देऊ नये, अशा सूचनाही ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी यावेळी दिल्या.