

वाई : गेल्या काही वर्षांत वाई शहरात चायनीज फूड स्टॉल्स, फास्ट फूड सेंटर, हॉटेल्स व खानावळींची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. या ठिकाणी अन्न सुरक्षा नियमांची पायमल्ली होत आहे. मात्र, याकडे एफडीएच्या अधिकार्यांकडून दुर्लक्ष होत आहे. वाई शहरात एफडीएच्या नियमित तपासण्या होत नसल्याने भेसळखोरांचे फावत आहे.
अन्न सुरक्षा कायद्यानुसार खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी एफडीएवर आहे. मात्र, वाई तालुक्यातील हॉटेल्स, मिठाई दुकाने, दुग्धजन्य पदार्थ विक्रेते तसेच पनीर, दही, श्रीखंड आणि आम्रखंड उत्पादक यांच्या किती तपासण्या करण्यात आल्या, किती नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आणि किती प्रकरणांत कारवाई झाली? हे गुलदस्त्यात आहे.
वाई तालुक्यातील खाद्यव्यवसायिकांकडून अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन केले जाते का, वापरले जाणारे खाद्यतेल प्रयोगशाळेच्या निकषांनुसार योग्य आहे का, कृत्रिम रंग, फ्लेवर्स व इतर रासायनिक घटकांचा वापर नियमांनुसार होतो का, याची पाहणी अधिकार्यांनी करणे आवश्यक आहे. एफडीएने नियमित तपासण्या, नमुना चाचण्या आणि जनजागृती मोहिमा राबवून वाई व सातारा जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी अधिक प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.