Wai theft: वाईत शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर लांबवणारा भामटा गजाआड

10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत : मेढ्यातही गुन्हा
Wai theft
Wai theftfile photo
Published on
Updated on

वाई : ‌ ‘तुमचा ट्रॅक्टर कंपनीत भाड्याने लावून देतो आणि दरमहा 30 हजार रुपये उत्पन्न मिळवून देतो,‌’ असे आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला वाई पोलिसांनी अटक केली आहे. संशयित आरोपीकडून 10 लाख रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, याच संशयिताला मेढा पोलिसांनीही अटक करून त्याच्याकडून ट्रॅक्टर जप्त केले होते.

अजय संतोष चव्हाण (वय 23, रा. सरताळे) याने स्वतःची ओळख ट्रॅक्टर भाड्याने देण्याच्या कंपनीचा एजंट म्हणून करून दिली होती. त्याने तक्रारदार निखिल तानाजी धुमाळ (वय 34, रा. नायगाव, ता. कोरेगाव) तसेच प्रशांत बबन सोळस्कर यांचा विश्वास संपादन केला. संशयिताने सोनगिरवाडी, ता. वाई येथे नोटरीद्वारे करार करून घेत, ‌‘तुमचे ट्रॅक्टर कंपनीत भाड्याने लावले जातील आणि दरमहा 30 हजार रुपये भाडे मिळेल, असे खोटे आश्वासन दिले. या आमिषाला बळी पडून संबंधित शेतकऱ्यांनी दोन ट्रॅक्टर अजय चव्हाण याच्या ताब्यात दिले.

मात्र, ट्रॅक्टर ताब्यात घेतल्यानंतर संशयिताने कोणतेही भाडे न देता मोबाईल फोन बंद करून पसार झाला. यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी अजय चव्हाण याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. याची गांभीर्याने दखल घेत वाईच्या पोलिस पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे शोध घेण्यात आला. अखेर पोलिसांनी अजय चव्हाण याला अटक करून त्याच्याकडून फसवणूक करून नेलेले 10 लाख रुपये किमतीचे दोन्ही ट्रॅक्टर जप्त करण्यात यश मिळवले.

पोनि जितेंद्र शहाणे, सपोनि अमोल गवळी, फौजदार सुधीर वाळुंज, पोलीस कर्मचारी नितीन कदम, हेमंत शिंदे, स्नेहल सोनावणे, विक्रम धोत्रे, श्रावण राठोड आणि विशाल शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

‌‘गोलमाल है भाई गोलमाल है‌’

ट्रॅक्टर फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या अजय चव्हाण याला सातच दिवसांपूर्वी मेढा पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून जावलीतील दोघांचे ट्रॅक्टर रिकव्हर करण्यात आले होते. तर शुक्रवारी वाई पोलिसांनी अटक केल्याचा दावा केला. त्यामुळे मेढा पोलिसांनी अटक केलेला संशयित वाई पोलिस अवघ्या सात दिवसांत कसे अटक करतील? वाई पोलिसांच्या दाव्यानुसार संशयिताला धाराशिव येथून अटक करण्यात आल्याचे सांगतात. त्यामुळे जर मेढा पोलिसांनी अजयला अटक केली असली, तर तो धाराशिव येथे कधी पोहोचला? पोलिसांनी अटकेची कारवाई कधी केली? जर मेढा पोलिसांनी त्याला अटक केली होती, तर फक्त जावलीतीलच गुन्हे कसे उघड झाले वाईतील का नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे या प्रकरणात गोलमाल झाल्याचा संशय होत असून, वाई पोलिसांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news