

वेळे : परतीच्या पावसाने वाई तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप पिकांना दणका दिला आहे. या पावसामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शेत शिवारामध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी ओसंडून वाहत होते. शेतीसह वाहतुकीवरही याचा विपरीत परिणाम झाला. यामुळे शेती नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
तालुक्यात अनेक ठिकाणी सोयाबीन, हळद, कांदा, झेंडू इतर तरकारी पिकांमध्ये पाणी साठल्याने ही पिके पाण्यात बुडालेली आहेत. त्यामुळे शेतकर्यांना लाखोंचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे भाजीपाल्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यात अधिक भर म्हणजे बाजारपेठेमध्ये दर कोसळल्याने शेतकर्यांना पावसाचा व दरांचा असा दुहेरी फटका बसत आहे. हळद पिकामध्ये पाणी साठल्याने हळदीला कीड लागण्याची भीती शेतकर्यांना सतावत आहे.
परतीच्या पावसाने खरीप हंगामावर मोठे संकट ओढवले असून शेतकरी अक्षरशः उघड्यावर आले आहेत. दरम्यान प्रशासनाने या नुकसानीचा पंचनामा करून शेतकर्यांना तात्काळ दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कांदा, हळद ही पिके बाधित झाली असून शेतकरी हतबल झाले आहेत. नैसर्गिक संकटामुळे वारंवार होणार्या पिकांच्या नुकसानी वर सरकारने तातडीने मदत जाहीर करावी. एकीकडे पावसाने पिके हातातून जात आहेत. तर दुसरीकडे दर कोसळत आहे. यातून भांडवली खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे.