

वाई : वाई शहरातील रामडोह आळी परिसरातील इंद्रजा आयकॉन इमारतीतील एका गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून 80.74 किलो वजनाचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. जप्त मालाची किंमत 2 लाख 59 हजार 484 रुपये असून या प्रकरणी सतीश पवार यांच्याविरुद्ध वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती गायकवाड यांनी रात्री उशिरापर्यंत कारवाई पूर्ण करत संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला. अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. संबंधित गोदामाचे मालक सतीश पवार हे बाहेरगावी असल्याचे सांगून घटनास्थळी उपस्थित राहिले नाहीत. वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांच्या उपस्थितीत गोदामाचे कुलूप तोडून तपासणी करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण माल जप्त करून गोदाम सीलबंद करण्यात आले.
सतीश पवार यांच्यावर यापूर्वीही अवैध गुटखा विक्रीप्रकरणी चार ते पाच वेळा कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वारंवार कारवाई होऊनही शहरात अवैध गुटखा विक्री सुरूच कशी राहते, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या कारवाईनंतर वाई शहरात अवैध गुटखा, तंबाखू तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. शहरातील अशा व्यवसायांवर प्रभावी नियंत्रण का येत नाही, याबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का?, याचाही शोध घेतला जात आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती गायकवाड यांनी सहाय्यक आयुक्त एस. बी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.