

सातारा : वृषभ जाधव याच्या खूनानंतर शनिवारी त्याच्या कुटुंबिय, नातेवाईकांनी पोलिस मुख्यालयावर धडक मारली. मुख्य तिन्ही संशयित आरोपींना तत्काळ अटक करावी. त्यांच्यावर संघटीत गुन्हेगारी (मोक्का) अंतर्गत कारवाई व्हावी. अन्यथा 26 जानेवारी रोजी पोलिस मुख्यालयासमोर कुटुंबियांसह आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
वृषभ जाधव याची आई सौ.संगीता राजेंद्र जाधव व चुलत भावाने यावेळी विविध मागण्या करुन पोलिसांना निवेदन दिले. दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, गुरुवारी दि. 22 जानेवारी रोजी वृषभ जाधव याला कोयत्याने मारुन क्रूरपणे खून केला आहे. याप्रकरणातील मुख्य सूत्रधार दिपक उर्फ आप्पा मांढरे, रविंद्र ढोणे, योगेश चोरगे यांना अद्याप अटक झालेली नाही. या संशयित तिघांनी शिताफीने कट रचून आप्पा मांढरे याच्या मुलासह त्याच्या साथीदारांनी खून केला आहे.
योगेश चोरगे याने गेल्या आठवड्यात फोन करुन तसेच समक्ष भेटून धमकी दिली आहे. धमकीवरुन कटात इतर दोघे असल्याचे समोर येत आहे. अशातच वृषभ जाधव याचा खून झाला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यामुळे वृषभ जाधव याच्या खून प्रकरणात राहिलेल्या तिघांना तत्काळ अटक करावी. मोक्का अंतर्गत सर्व संशयितांवर कारवाई व्हावी. 26 जानेवारीपर्यंत अटक झाली नाही तर जाधव कुटुंबिय पोलिस मुख्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे.