

वेणेगाव : पुणे ते बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अतीत (ता. सातारा) गावाच्या हद्दीत मंगळवारी पहाटे बंगळूरहून मुंबईकडे जाणार्या व्होल्वो बसने प्रथम मालवाहू ट्रकला व त्यानंतर ट्रॉलीला धडक दिली. या अपघातात बसचालक जखमी झाला आहे.
बसमधील 35 प्रवासी बचावले आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक बराचकाळ विस्कळीत झाली होती. या अपघाताची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. रवी पुटप्पा तळवार (वय 39, रा. चुडळळी, ता. मुडगूर, जि. कारवार, कर्नाटक) असे जखमी चालकाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी बंगळूर ते मुंबई ही व्होल्वो बस (एमएच 12 डबल्यूजे 1764) ही कराड लेनवर अतीतजवळ आली असता बसने मालट्रकला धडक दिली. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्ता दुभाजकालगत असणार्या ट्रॉलीस धडकली. या धडकेत व्होल्व्होचे बोनेट तुटून स्टेअरिंग लागल्याने चालक जखमी झाला.
या घटनेनंतर बोरगाव पोलीस ठाण्याचे अपघात विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, पोलीस हवालदार अमोल गवळी, संजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्या ट्रॉलीला बसने धडक दिली ती ट्रॉली नारळाच्या झाडाला लागून होती. या झाडामुळे व्होल्वो थांबली. जर झाड नसते तर बस सरळ या दरम्यान सावेकर कुटुंबाच्या घरात शिरली असती. या घरात पाच जण झोपले होते. नारळाच्या झाडामुळे गाडी थांबल्याने या सावेकर कुटुंबाचे प्राण वाचले.
गेली अडीच ते तीन वर्षे सुरु असलेल्या शेंद्रे ते कागल सहापदरीकरण कामात अनेक त्रुटी आहेत. या त्रुटींविरोधात दै. ‘पुढारी’ने मोहीम उघडली आहे. ठेकेदार कंपनीच्या त्रुटींमुळेच हा अपघात झाला आहे. महामार्गावर वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी जागोजागी गतिरोधक तयार करण्यात आले आहेत; मात्र हेच गतिरोधक वाहतूक कोंडी व अपघातास कारणीभूत ठरत आहेत. अतीतजवळ कुणाचीही मागणी नसताना भला मोठा गतिरोधक करण्यात आला आहे. हा गतिरोधक कुणाच्या सांगण्यावरून केला तसेच गतिरोधक ठेवण्याचा अट्टाहास कोणाचा, असा सवाल केला जात आहे. सेवा रस्त्यावरील या भानगडी अपघातांना निमंत्रण देत आहेत.