

तरडगाव : बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत कर्तव्यावर असताना वीरमरण आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक, तरडगाव येथील सुपुत्र मुंबई पोलिस विशेष सुरक्षा अधिकारी हेड कॉन्स्टेबल विदीप दिलीप जाधव यांच्यावर बुधवारी रात्री 11 वाजता तरडगाव येथील पालखी तळावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
बुधवारी सकाळी विदीप जाधव यांच्या निधनाची दुःखद बातमी गावात पसरताच तरडगावावर शोककळा पसरली. जाधव यांच्या निवासस्थानी सकाळपासूनच नातेवाईक, ग्रामस्थ, पोलिस मित्रपरिवार व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री सुमारे 10 वाजता गावातून शोकमिरवणूक काढण्यात आली.‘भारत माता की जय, वंदे मातरम्, अमर रहे अमर रहे, विदीप जाधव अमर रहे’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला. तरडगाव येथील पालखी तळावर तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव आणि पोलिस निरीक्षक जायपत्रे यांच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करून शासकीय मानवंदना देण्यात आली. त्यांचे सुपुत्र अद्वित जाधव यांनी पित्याला भडाग्नी दिला. यावेळी उपस्थित मान्यवर, माजी सैनिक, पोलिस अधिकारी व नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली. अंत्यसंस्कारप्रसंगी फलटण तालुक्यासह परिसरातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विदीप जाधव यांचे प्राथमिक शिक्षण तरडगाव येथे झाले. अकरावी-बारावीचे शिक्षण त्यांनी नायगाव (मुंबई) येथे पूर्ण केले. त्यानंतर पोलिस भरती ॲकॅडमीत प्रवेश घेत 2009 साली ते मुंबई पोलिस दलात दाखल झाले. 2010 साली सांगवी येथील संध्या यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी संध्या, मुलगी नेत्रा (वय 13) व मुलगा अद्वित (वय 9) असा परिवार आहे. ते कुटुंबासह मुंबईत वास्तव्यास होते. सेवाकाळात सुरुवातीचे एक वर्ष त्यांनी पोलिस ठाण्यात काम केले. त्यानंतर 2010 ते 2014 दरम्यान न्यायमूर्ती जी. ए. सानप यांचे, तर 2014 ते 2019 या कालावधीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुरक्षा रक्षक म्हणून त्यांनी कर्तव्य बजावले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा त्यांनी अनेकदा सहकाऱ्यांकडे व्यक्त केली होती. 2019 साली त्यांची ही इच्छा पूर्ण झाली आणि ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्त झाले. अत्यंत निष्ठेने, प्रामाणिकपणे व जबाबदारीने त्यांनी आपली सेवा बजावली.