

विडणी : विडणी येथे अंधश्रद्धेतून महिलेच्या झालेल्या निर्घृण खुनाबाबत चौथ्या दिवशीही पोलिसांचा कसून तपास सुरूच आहे. रविवारी रात्री उशिरा या ठिकाणी मृत महिलेचा सडलेल्या अवस्थेतील एक हात सापडला आहे. दरम्यान, या महिलेचे धड अद्याप सापडलेले नसून पोलिसांसमोरील आव्हान कायम आहे.
विडणी, ता. फलटण येथे शुक्रवारी एका उसाच्या शेतात महिलेचा खून झाल्याचे निदर्शनास आले होते. याआधी महिलेचा कंबरेखालील अर्धवट मृतदेह व कवटी आढळून आली होती. हा प्रकार अंधश्रद्धेतून घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मृतदेहाचा उर्वरित भाग शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. परिसरातील 15 ते 16 एकरातील ऊस तोडण्याचे काम सुरूच आहे. यासाठी पाचशे मीटर परिसरात ऊसतोड कामगार, शेत मालकांशिवाय इतरांना प्रवेश बंदी केली आहे, तसेच कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सोमवारी मृत महिलेचा सडलेल्या अवस्थेतील एक हात परिसरात पोलिसांना सापडला.
दरम्यान, पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह पोलिस उपअधीक्षक राहुल धस, पोलिस निरीक्षक सुनील महाडीक घटनास्थळी ठाण मांडून आहेत. रात्रंदिवस पोलिसांची फौज कसून तपास करत आहे. सापडलेल्या मृतदेहाचे अवशेष वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, महिलेच्या शरीराचा कवटी व कमरेखालचा भाग व आता एका हाताचे अवशेष सापडले असले तरी मानेपासून कमरेपर्यंतचा धडाचा भाग अद्यापही सापडलेला नाही.