

महाबळेश्वर : वेण्णालेक बायपास मार्गावरील मुख्य रस्ता व कमानी पुलाच्या उभारणीतील सर्व अडथळे ना. मकरंद पाटील यांच्या प्रयत्नाने दूर झाले आहेत. यामुळे महाबळेश्वर पर्यटन विकासाचा रस्ता खुला झाला आहे. वन विभागाच्या 78 गुंठे जागेच्या फेज-1 वळतीकरणास केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. लवकरच या पर्यायी कमानी पूल व रस्त्याच्या कामाला प्रारंभ होणार आहे. यामुळे आता नागरिक व पर्यटकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
महाबळेश्वर ते पाचगणी या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वेण्णालेकपासून एकेरी वाहतूकीचा पर्याय समोर आला आहे. यासाठी बायपास रस्ता मंजूर करण्यात आला आहे. वेण्णालेक येथून वाहतूक वळवण्यात येणार आहे. ही वाहतूक पुढे धनगरवाडा मार्गे अप्सरा हॉटेल येथून मुख्य रस्त्यावरून शहरात वळवली जाणार आहे. यासाठी 1 हजार 750 मीटर लांबीचा रस्ता एक छोटा पूल व वेण्णालेक येथील सांडव्याखाली एक कमानी पूल बांधण्यात येणार आहे. अप्सरा हॉटेलपासून 1 हजार 300 मीटर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण या कामासाठी 10 कोटी रुपये तर पुढे 450 मीटर लांब रस्ता व 30 मीटर गाळयांचा कमानी पूल या कामासाठी 15 कोटी रूपये असा एकूण 25 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
गेली अनेक वर्षे हा प्रकल्प रखडला होता. ना. मकरंद पाटील यांच्या दीर्घ पाठपुराव्यानंतर या कामासाठी केंद्रासह राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचीही मंजूरी मिळाली आहे. या कामासाठी वन विभागाने 78 गुंठे जागा या प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिल्याने या कामातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. बांधकाम विभागाच्यावतीने वेण्णालेक बायपास रस्त्यावर बांधण्यात येणारा कमानी पुल हा पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. पावसाळयात वेण्णा धरणाच्या सांडव्यावरून वाहणारे पाणी, जंगल व सूर्यास्ताचे विहंगम दृश्य पाहता येणार असल्याचे बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी अजय देशपांडे यांनी सांगितले.